‘नुकसान भरपाईचे निकष बदलून जनतेला भरघोस मदत करा- अमित इब्रामपूरकर
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे नुकसानीचे प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करावेत तसेच नुकसान भरपाईचे निकष बदलून जनतेला भरघोस मदत करावी अशी मागणी तालुका मनसेच्या वतीने मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मालवण तालुक्याला आतापर्यंत सर्वाधिक फटका ‘तौक्ते’ मुळे बसलेला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण शहर व तालुक्यात अपरिमित नुकसान झालेले आहे.लोकांचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे.या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत.तसेच ‘निसर्ग’ चक्रीवादळावेळी नुकसान भरपाई देताना जसे निकष बदलले होते तसे आताही पुन्हा निकष बदलून शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी.
घरांचं, मालमत्तेचं,पीकांचं किती नुकसान झालं आहे याचा आढावा घेण्यास सुरुवात करावी. काल सकाळपासून तीव्र गतीचा वारा व समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनारपट्टी भागात विशेषत: तारकर्ली,वायरी,दांडी देवबाग व अन्य काही भागात लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी घुसून नुकसान झाले आहे.
लोकांच्या घरांवर झाडे,झाडांच्या फांद्या पडून छप्परांचे नुकसान झाले आहे.रस्त्यांवर मोठमोठी आंब्याची झाडे,नारळाची झाडे,नारळाची झाडे कोसळून विद्युत तारा तुटून पडलेल्या आहेत.यासंदर्भात महावितरण अधिकार्यांशी समन्वय साधून काल पहाटे पासून खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत.
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे तालुक्यात फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या वादळात पावसाचा देखील मोठा जोर होता.त्यामुळेही पिकांची मोठी हानी झाली आहे.आंबा, काजू, नारळ, सुपारी, केळी या लागवडीखालील फळ पिकांचे नुकसान झाले आहे.सबब तालुका कृषी विभागामार्फत या वादळातील झालेल्या फळपिकांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे युद्धपातळीवर केले जाण्याचे आपलेकडून आदेश व्हावेत यासाठी आम्ही हे निवेदन मालवण तालुका मनसेतर्फे देत असल्याचेही म्हटले आहे.