You are currently viewing तौक्ती वादळाने आंबा बागायतदार – शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान 

तौक्ती वादळाने आंबा बागायतदार – शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान 

आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी

भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली यांची मागणी

देवगड

तौक्ती वादळाने देवगड तालुक्यातील आंबा उत्पादक आणि शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून हंगामातील शेवटच्या 15 दिवसांतील आंबा पीक चक्रीवादळाने गळून पडले आहे. तौक्ती वादळाने देवगड तालुक्यासह जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायततदारांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी देवगड भाजपा तालुकाध्यक्ष तथा आंबा बागायतदार डॉ.अमोल तेली यांनी केली आहे.

बँकेच्या कर्जाच्या ओझ्याने पिचलेल्या आणि आधीच अल्प उत्पादनाने हवालदिल झालेल्या आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांच्या तोंडचे पाणीच चक्रीवादळात झालेल्या नुकसानीने पळाले आहे. आधीच यावर्षी सरासरी उत्पादनाच्या केवळ 40 टक्केच आंबा पीक आले होते. त्यातही 14 मे नंतर शेवटच्या 15 दिवसांच्या हंगामातील पीक हातातोंडाशी आले होते. झाडावरील हापूस आंबा काढून त्याची विक्री लवकरात लवकर करण्यासाठी शेतकरी आणि बागायतदारांची लगबग सुरू होती. या शेवटच्या हंगामातील आंबा विक्रीतूनच हापूस उत्पादक शेतकरी आणि बागायतदार आपली कर्जे आणि अन्य देणी फेडत असतात. मात्र तौक्ती चक्रीवादळाने देवगड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे हापूस पीक होत्याचे नव्हते झाले आहे. कलमावर असलेले आंबे गळून खाली पडले आहेत. त्यामुळे आंबा बागयदारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेवटच्या हंगामातील पिकाच्या भरवशावर असलेल्या आंबा उत्पादक शेतकरी आणि बागयतदारांना जीवन जगणे कठीण होणार आहे. त्यात आंबा पिकाच्या भरवशावर घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्याचा तगादा बँकाकांडून सुरू होणार आहे. आधीच कोरोनामुळे अन्य उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. चक्रीवादळामुळे झालेले नुकसान लक्षात घेत राज्य सरकारने कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि बागायततदारांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी आणि विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी आग्रही मागणी भाजपा देवगड तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा