You are currently viewing मालवण बंदरात ‘तीन’ नंबरचा बावटा…

मालवण बंदरात ‘तीन’ नंबरचा बावटा…

नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा- तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन…

मालवण

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर किनारपट्टी भागात समुद्राच्या भरतीचे पाणी वाढत असून लाटांचे पाणी किनार्‍यावर घुसले आहे. समुद्रातंर्गत बदल सुरू झाल्याने मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. येथील बंदरात बंदर विभागाच्यावतीने तीन नंबरचा बावटा लावला आहे.

दरम्यान समुद्रकिनार्‍यापासून दोन किलोमीटर परिसरात असणार्‍या नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आज व उद्या नागरिकांनी बाहेर पडू नये. वार्‍याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपेक्षा जास्त असणार असल्याने सर्वांनी सतर्क राहावे व प्रशासनाकडून दिल्या जाणार्‍या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीस तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. किनारपट्टी भागातील गावांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर काल तहसीलदारांसह अन्य अधिकार्‍यांनी देवबाग गावास भेट देत स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास चर्चच्या ठिकाणी, स्थानिकांची उंच असलेली रिसॉर्ट याठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास तहसीलदारांनी केल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीच्यावतीने गावात ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर काल रात्री शहरासह तालुक्यात विजेच्या लखलखाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. शहर परिसरात सकाळी काही काळ ढगाळ तर अधूनमधून कडक ऊन पडले होते. सकाळच्या सत्रात समुद्र शांत असल्याचे दिसून आले. मात्र दुपारनंतर समुद्रास आलेल्या भरतीचे पाणी किनार्‍यावर घुसत असल्याचे दिसून आले. शहरातील बंदर जेटी, दांडी, देवबाग, तारकर्ली, तळाशील किनारपट्टी भागात भरतीचे फेसाळयुक्त पाणी आत घुसले होते.

किनारपट्टी भागास चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने स्थानिक मच्छीमारांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्याचे दिसून आले. मच्छीमारांनी आपल्या मासेमारीच्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. मासेमारीसाठीचे अन्य साहित्यही त्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवले असल्याचे दिसून आले. चक्रीवादळाचा परिणाम तीन दिवस कायम राहणार असल्याने सावधानतेचा इशारा म्हणून बंदर विभागाच्यावतीने बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा