You are currently viewing सिंधुदुर्गात अतिदक्षतेच्या सूचना…

सिंधुदुर्गात अतिदक्षतेच्या सूचना…

सिंधुदूर्ग :

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १४ व १५ मे रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर दिनांक १६ व १७ मे रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यात वर्तविण्यात आलेली आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.

दिनांक १५ मे २०२१ रोजी अरबी समुद्रातील ‘ताऊते’ या चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर ४० ते ५० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दिनांक १६ मे २०२१ रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर ५० ते ६० ते ७० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दिनांक १७ मे २०२१ रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर ४० ते ५० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.

चक्रीवादळाच्या कालावधीत विजा चमकणार असल्याने या कालावधीत पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी.

१. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.

२. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.

३. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

४. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

५. विजेच्या खांबांपासून लांब रहावे.

६. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.

७. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास , गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.

८. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

चक्रीवादळ कालावधीत वाहणारा सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षांत घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगावी-

१) मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वा-यात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित  ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.

२) अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.

३) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

४) मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ ला संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी (०२३६३)२५६५१८ , सावंतवाडी तालुक्यासाठी (०२३६३)२७२०२८, वेंगुर्ला तालुक्यासाठी (०२३६६)२६२०५३, कुडाळ तालुक्यासाठी (०२३६२)२२२५२५ , मालवण तालुक्यासाठी (०२३६५)२५२०४५, कणकवली तालुक्यासाठी (०२३६७)२३२०२५, देवगड तालुक्यासाठी (०२३६४)२६२२०४, वैभववाडी तालुक्यासाठी (०२३६७)२३७२३९ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

५) हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.

६)कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी.किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.

७)आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत आपण जागरूक रहावे व प्रशासनास सहकार्य करावे.

८) पूरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे यावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

९) जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.

१०) मुसळधार पाऊस पडत असताना तसेच  सोसाट्याचा वारा वाहत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले इ.ठिकाणी जावू नये.

११) आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.

१२)हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून  जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

 

( के.मंजुलक्ष्मी )

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा