– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
भारतीय हवामान खात्याने दि. 16 ते 18 मे 2021 दरम्यान जिल्ह्याला चक्रिवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. आरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा वेग आणि दिशा अजून निश्चित नसली तरी प्रथमिक अदाजानुसार गोवा व दक्षिण कोकण किनाऱ्याला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चिक्रिवादळाच्या काळात जिल्ह्यातील विद्युत पुरवठा विशेषतः रुग्णालयांचा विद्युत पुरवठा व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज चिक्रिवादळासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता श्री. शेवाळे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बंड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बीएसएनएलची सेवा अखंड सुरू राहील यासाठी बीएसएनएलने नियोजन करावे अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्याकी. जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा मुख्यतः रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधून होतो. रत्नागिरीहून येणाऱ्या रस्त्यांच्याबाबत तसेच कोल्हापूरकडे जाणारा मार्ग म्हणजेच करुळ घाट आणि फोंडा घाट हे दोन्ही सुस्थितीत राहतील याची जबाबदारी कणकवली कार्यकारी अभियांता यांची राहील. तसेच गरज पडल्यास आंबोली घाटाचाही वापर करता यावा यसाठी सावंतवाडी विभागाने हा घाट वाहतुकीसाठी खुला राहील याची दक्षता घ्यावी. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार रविवार व सोमवार असे दोन दिवस जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे झाडे पडून रस्ता बंद होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये तातडीने रस्ता सुरू करण्यासाठी जेसीबी, वूड कटर व इतर सहसाहित्यासह किमान एक पथक घाट मार्गामध्ये तसेच रुग्णालयांकडे जाणाऱ्या मार्गांवर तैनात करण्यात यावे. यासाठी गरज भासल्यास बाहेरील जिल्ह्याकडून पथकांची मागणी करावी. त्यास आपण स्वतः तात्काळ व्यवस्थाकरून परवानगी देऊ. वादळामुळे विद्युत पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कोविडच्या रुग्णांना जे व्हेंटीलेटरवर व ऑक्सिजनवर आहेत त्यांना काही धोका होऊ नये म्हणून प्रत्येक कोविड रुग्णालयामध्ये जनरेटरची व्यवस्था ठेवावी. त्याशिवाय किनारपट्टीच्या भागामध्ये रुग्णवाहिका तैनात करण्यात याव्यात, जेणेकरून रुग्णांना इतरत्र नेण्याची गरज पडल्यास तात्काळ कार्यवाही करता येईल. तसेच एक बॅकअप प्लान म्हणून विश्रामगृहांचीही व्यवस्था ठेवण्यात यावी. येत्या तीन दिवसांमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे व सर्वांच्या समन्वयाने व संपर्कात राहून काम करावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
00000