You are currently viewing जिल्ह्यातील संवेदनशील खाजगी डॉक्टर जनतेच्या आवाहनाला निश्चितच प्रतिसाद देतील

जिल्ह्यातील संवेदनशील खाजगी डॉक्टर जनतेच्या आवाहनाला निश्चितच प्रतिसाद देतील

ॲड. नकुल पार्सेकर

कोरोनाचा महाभंयकर विषाणू हा आपल्या जिल्ह्यात दिवसेंदिवस हाहाकार माजवत आहे.लाँकडाऊन नंतरही रूग्ण संख्या किंवा डेथरेट खाली यायचं नांव घेत नाही. जिल्हाधिकारी मँडम आपल्या संपूर्ण यंत्रणेसह अहोरात्र या जिल्ह्यातील जनतेच्या जीवीताच्या रक्षणासाठी कष्ट घेत आहे.महसूल, आरोग्य आणि पोलीस यंत्रणा,सामाजिक संस्था, सेवाभावी व्यक्तीही आपापल्या क्षमतेनुसार मदत कार्यात सक्रिय आहेत.एंकदरीत आजच्या जिल्ह्यातील या भीषण परिस्थितीचा विचार केल्यास ही गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित होईल की ज्या आरोग्य यंत्रणेकडे इतकी वर्षे ज्या गांभीर्याने आणि जबाबदारीने लक्ष द्यायला पाहिजे होती त्याबाबत सर्वच राजकीय पक्षाचे नेते कमी पडले किंवा राजकीय साठमारी आणि श्रेयवादात अडकले..पण आताची वेळ ही या परिस्थितीला जबाबदार कोण? किंवा कोण चुकीच वा बरोबर यावरं चर्चा करण्याची मुळीच नाही. मानवता हा आपला धर्म आहे.म्हणूनच जिल्ह्यातील प्रत्येक घटकांनी असलेले मतभेद बाजूला ठेवून ,जात,धर्म, पंत,पक्ष या सगळ्या गोष्टींना काही काळ तिलांजली देवून या जिल्ह्यातील प्रत्येकाला आपण दिलासा देण्यासाठी कटीबद्ध होणे ही आजची गरज आहे.
या जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा आहेत.आवश्यक कर्मचाऱ्यांचा अभाव,साधनसुविधांचा अभाव असे असतानाही कार्यरत असलेले कर्मचारी आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून प्रत्येक नागरीकांना आरोग्य सेवा देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे.या जिल्ह्याच्या विकासाच्या मोठ्या बढाया मारणाऱ्या राजकीय मंडळीना जरी ही वस्तुस्थिती अवगत झाली आणि त्यांनी थोडेजरी आत्मचिंतन करुन आपल्या वर्तनात काही सकारात्मक बदल केला तर या जिल्ह्यातील जनता त्यांना दुवा देतील.
शासकीय हाँस्पिटलमध्ये काही ठिकाणी आवश्यक मशिनरी आहे तर तज्ञ कर्मचारी नाहीत तर काही ठिकाणी आवश्यक डॉक्टर नाहीत.यामुळे अनेक रूग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत परिणामी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.अनेकांचे संसार उध्वस्त झाले.जिल्ह्यातील आजच्या या आरोग्यविषयक उपचार आणि सुविधांची अवस्था पाहूनच कोणताही रुग्ण घाबरून अगोदरचं अर्धामेला होतो आणि त्याच मानसिक संतुलन बिघडत तो भयभीत होतो.
आजच्या या परिस्थितीवर मात करायची असेल तर या जिल्ह्यातील सर्व खाजगी डाँक्टरानी महाराष्ट्राच्या मा.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे.सुदैवाने या जिल्ह्यातील खाजगी डॉ. हे सेवाभावी आहेत त्यामुळे या आवाहनाचा ते निश्चितच विचार करून प्रतिसाद देतील आणि या जिल्ह्यातील भयभीत झालेल्या रुग्णाना आधार देतील.आदरणीय साने गुरूजी म्हणतात…”खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे”…आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम जनता खाजगी डाँक्टराना विनंती करत आहे..कि हीच वेळ आहे आपण आपल्या बंधूभगिनींना मदतीचा हात देण्याची..हीच वेळ आहे आपल्या समर्पणाची आणि हीच वेळ आहे आपली संवेदनशीलता जपण्याची…आणि आपण ती जपालं हा या जिल्ह्यातील जनतेला विश्वास आहे…चला तर मग…लागा कामाला.या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त आपलीचं माणसं आपल्याला हाक मारत आहेत…आपली वाट पहात आहे..आपला एक हात मदतीचा..आपल्या संवेदनशीलतेचा…

प्रतिक्रिया व्यक्त करा