पालकमंत्री मा.उदय सामंत यांच्याकडे ग्राहक पंचायतची मेलद्वारे मागणी.
वैभववाडी.
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर १४ ते १६ मे दरम्यान चक्रिवादळाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हावासियांच्या मनात आपली घरे, मांगरांच्या शाकारणीची चिंता भेडसावू लागली आहे. सध्या संपुर्ण जिल्ह्यात टाळेबंदी अंतर्गत सर्वच दुकाने बंद असल्याने शाकारणी किंवा संभाव्य चक्रिवादळापासून आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ‘पत्रे, दोरी, प्लास्टिक, कापड किंवा अन्य आवश्यक साहित्य’ मिळणे दुरापास्त झाले आहे. या वस्तूं उपलब्ध करून देण्यासाठी काही महत्त्वाची दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने मेलद्वारे करण्यात आली आहे.
सर्वसामान्य ग्राहक वर्ग दुकानदारांकडे मागणी वजा विनंती करीत आहे. मात्र टाळेबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे व्यापारीही दुकान उघडण्यास असमर्थता दर्शवित आहेत.
संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने मर्यादित वेळेत दुकाने उघडण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करता या मागणीचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा समर्थन करीत आहे.
सर्वसामान्य जनतेच्या मालमत्तेचे चक्रिवादळा पासुन संरक्षण करण्याच्यादृष्टीने तातडीने निर्णय घेऊन अशा वस्तू व साहित्याची विक्री करणारी हार्डवेअर व कपड्याची दुकाने ‘काही बंधने घालून मर्यादीत वेळे पुरती का होईना’ पण सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती मेलद्वारे ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर करीत आहोत. या बाबत आवश्यक असल्यास आपल्याशी प्रत्यक्ष किंवा व्हीसीद्वारे चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.
इतर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती बरी होती. परंतु सध्या परिस्थिती गंभीर होत आहे. आपण पालकमंत्री या नात्याने वेळोवेळी घेतलेली भूमिका तसेच मा.जिल्हाधिकारी, के. मंजूलक्ष्मी यांच्यामुळे हे शक्य झालेले आहे.
आम्ही केलेल्या विनंती वजा मागणीचा सकारात्मकपणे विचार व्हावा, ही विनंती.