देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भाजपात उत्तर प्रदेश मध्ये सर्व काही ठीक नसल्याचंच यातून समोर येतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे. याच दरम्यान आता काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“कुत्रे मृतदेहांचे लचके तोडताहेत, मृतदेह नदीत फेकले जाताहेत अन् योगीजी All Is Well म्हणताहेत” असं म्हणत काँग्रेसने घणाघात केला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत. कचऱ्याच्या गाड्यांमधून मृतदेह वाहून नेले जात आहेत. मृतदेह नदीत फेकले जात आहे असं असतानाही योगीजी तुम्ही सर्वकाही ठीक असल्याचं सांगत आहात. संत आणि महंत स्वप्नातही खोटं बोलत नाहीत असं म्हणतात. मात्र तुम्ही सर्वकाही ठीक आहे, असा खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय” असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.