अशी कामगिरी करणारी जगातली पहिलीच व्यक्ती ठरली भारतीय कन्या…
सारा छीपा मूळची राजस्थानची असणारी मात्र सध्या दुबईमध्ये वास्तव्यास असणारी या मुलीनं एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. जगभरातले तब्बल १९६ देश, त्यांच्या राजधान्या आणि त्या त्या देशांमध्ये वापरलं जाणारं चलन यासर्व गोष्टी सारा छीपाच्या तोंडपाठ आहेत. २ मे रोजी दुबईमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता ऑनलाईन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात सारा छीपानं हा विश्वविक्रम केला आहे. हा कार्यक्रम युट्यूब, फेसबुक आणि लिंक्डइनवर लाईव्ह करण्यात आला होता. या श्रेणीमध्ये विक्रम नोंदवणारी सारा ही जगात पहिलीच व्यक्ती ठरली आहे. साराच्या या कामगिरीनंतर राजस्थानमधील भिलवाडा या तिच्या मूळगावी जल्लोष करण्यात आला.
आत्तापर्यंत सर्व देश आणि त्यांच्या राजधानींची नावं तोंडपाठ ठेवण्याचा विश्वविक्रम करण्यात आला होता. मात्र, साराने त्यापुढे एक पाऊल टाकत या दोन गोष्टींसोबतच या सर्व देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चलनांच्या माहितीचाही आपल्या विक्रमात समावेश केला. देशांची नावं, त्यांच्या राजधानींची नावं आणि त्यांच्या चलनांची नावं अशी एकूण ५८५ नावं तोंडपाठ करण्यासाठी सुरुवातीला साराला चक्क दीड ते दोन तास लागत असत. पण सलग तीन महिने सराव केल्यानंतर हा वेळ दीड ते दोन तासांनंतर थेट १५ मिनिटावर आला! या सर्व नावांचे उच्चार योग्य पद्धतीने लक्षात ठेवण्याचं एक महाकठीण कर्म सारानं सरावातून सोपं करून दाखवलं. त्यामुळे सगळ्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
सारानं तिचे मार्गदर्शक सुशांत मैसोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पद्धतींचा तिने सरावात समावेश केला. सारा सुरुवातीला फक्त या पद्धती शिकत होती. मात्र, तिच्यातलं कसब पाहून मैसोरेकर यांनीच विक्रमासंदर्भात विचारणा केली, असं तिचे वडील सुनील छीपा सांगतात. एक वर्षांची असतानाच सारा तिच्या आई-वडिलांसोबत दुबईला आली. तेव्हापासून ती इथेच शिकते. २ मे रोजी झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात सारानं हा विक्रम प्रस्थापित केला आहे.
हा कार्यक्रम झाला, तेव्हा OMG Book of Records या संघटनेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. त्यामुळे साराने दिलेली सर्व उत्तरं बरोबर आणि निश्चित वेळेतच आल्याची खात्री देखील करण्यात आली आहे.