नगराध्यक्ष समीर नलावडे
कणकवली:
कणकवली शहरात ज्या घरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या घरातील इतर लोकांनी स्वाब तपासणी करणे गरजेचे आहे. ज्या घरांमध्ये कोरोना चे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या घरातील व्यक्ती होम क्वारंटाईन असतानादेखील खुलेआम लोकांमध्ये मिसळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे कणकवली शहरात हळूहळू कमी होत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे.
एकीकडे प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले असताना अशाप्रकारे शहरातील काहींकडून करण्यात येत असलेला हलगर्जीपणा हा प्रशासन व नगरपंचायत गांभीर्याने घेण्यात येणार असून, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तीने नियमाप्रमाणे चौदा दिवस क्वारंटाईन राहायचे आहे. मात्र काही व्यक्ती शहरात फिरताना किंवा इतर लोकांमध्ये मिसळताना आढळत असल्यामुळे अशांवर कडक कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.
यासंदर्भात पोलिस व आरोग्य विभागाकडूनही आवाहन करण्यात आले आहे. मात्र काहीं कडून होणाऱ्या हलगर्जीपणामुळे शहरात रुग्ण वाढण्याची भीती आहे. जनता कर्फ्यू च्या माध्यमातून शहरवासीयांनी व्यापाऱ्यानी नगरपंचायत ला जे सहकार्य केले केले त्यानंतर हळू हळू शहरातील रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र काहीन कडून निष्काळजीपणा दाखवत नियमांची पायमल्ली होत असल्याने जर अशी व्यक्ती बाहेर फिरताना आढळली तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून होणार आहे. तसेच कणकवलीत ज्या घरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तीनी दुकाने देखील सुरू ठेवल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यास चालना मिळू शकते. कोरोनाची दुसरी लाट गांभीर्याने घेतली जात असताना असा हलगर्जीपणा कोणीही करू नये. असे केल्यास प्रशासनामार्फत दंडात्मक व कायदेशीर देखील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी नियम पाळा असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.