You are currently viewing अखेर 5वी व 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली..

अखेर 5वी व 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली..

आम. कपिल पाटील यांची मागणी अखेर मान्य..

तळेरे

आमदार कपिल पाटील यांनी 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परिक्षांबाबत 29 एप्रिल रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना पत्र लिहलं होतं. 4 मे रोजी शिक्षण आयुक्तांनी कपिल पाटील यांच्या पत्रावर रिमार्क मारत ‘परीक्षा रद्द करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात’ असे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला दिले होते. त्यानुसार 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी आज जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी दिली आहे.

मे मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा तूर्तास रद्द कराव्यात. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर परीक्षा आयोजनाबाबत विचार व्हावा. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अडकून न पडता पालक व विद्यार्थी यांना गावी जाणे सोयीचे पडेल. यासाठी तातडीने आदेश व्हावेत, अशी विनंती कपिल पाटील यांनी शिक्षण आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 1ली ते 9वी आणि 11वी परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र दि. 23 मे रोजी होणाऱ्या 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्यभर विद्यार्थी, शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे तातडीने शिष्यवृत्ती परिक्षांबाबत निर्णय करण्याची विनंतीही कपिल पाटील यांनी पत्रात केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा