महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची पालकमंत्री यांच्याकडे मागणी
कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिक्षक फिल्ड वर काम करणार आहेत. कदाचित ते कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतात. त्यामुळे जिल्हास्तरावर मध्यवर्ती कोणत्याही 3 ठिकाणी फक्त शिक्षकांसाठी स्वतंत्र लसीकरण कॅम्प आयोजित करून सर्व शिक्षकांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजू वजराटकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षकांना लसीकरण आणि त्यानंतर फिल्ड वर ड्युटी काढण्यात यावी याबाबत शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्य अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून असे कळविले की सध्या लसीकरण प्रक्रिया ही ऑनलाइन असल्यामुळे आपण रजिस्ट्रेशन शिवाय लस देऊ शकत नाही, असे सांगितले. यावेळी संघटनेला पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून तोडगा निघू शकेल असे वाटले, त्या नुसार शुक्रवारी ७ मे रोजी पालकमंत्री श्री. सामंत यांना ओरोस येथे निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये सदर कोविड 19 ला अनुसरून वेगवेगळ्या ड्युट्या करत असताना शिक्षक पाँझिटिव्ह आल्यास त्यांच्यासाठी बेडची उपलब्धता होणेसाठी ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी श्री. वजराटकर यांच्या सोबत राज्य कार्यकारीणी सदस्य श्री प्रवीण पाताडे उपस्थित होते.