पालकमंत्री मा.ना.श्री.उदय सामंत यांना भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने निवेदन सादर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी १२ नव्याकोऱ्या सुसज्ज सेवायुक्त, तीन दरवाजे असलेल्या रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या रुग्णवाहिकांचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी दिनांक ३ मे रोजी दिली. कोरोनाच्या आपत्तीकाळात जिल्ह्याला अद्ययावत रुग्णवाहिकांची नितांत गरज असल्याने जिल्हा परिषदेकडून घेण्यात आलेला निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आणि हिताचा आहे.
रेडी गावात सन १९५२ पासून मायनिंग उत्खनन करण्यात येत आहे. रेडी गावातील मायनिंग कंपन्यांनी लोहखनिज खाणी उत्खनन करण्याव्यतिरिक्त सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने ” जिल्हा खनिकर्म निधी” यामध्ये आतापर्यंत करोडो रुपये देणगी/वर्गणी म्हणून दिलेली आहे. मायनिंग कंपनीने आतापर्यंत ” निगमीत सामाजिक दायित्व” म्हणून करोडो रुपये खर्च केलेला आहे. तसेच मायनिंग कंपनीने आतापर्यंत राजपथ (प्रभुत्व) व कराच्या माध्यमातून करोडो रुपये शासकीय तिजोरीत जमा केलेले आहेत.
रेडी गावात शेतकऱ्यांच्या मालकीच्या क्षेत्रात मायनिंग कंपन्यांनी ठरल्याप्रमाणे पुरेसे पाणी पुरवठा न केल्यामुळे म्हारतळे वाडी, बोंमडोजीची वाडी, सुकळभाट वाडी येथील सुमारे १२८३ नारळाची झाडे पाण्याअभावी सुकून गेली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सुमारे रु. ३८,४९,०००/- एवढे नुकसान झाले. पंचायत समिती, वेंगुर्ला येथील मासिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेल्या ठराव क्र.६४३ प्रमाणे तालुका कृषी अधिकारी, वेंगुर्ला यांनी रेडी गावातील शेतकऱ्यांच्या माड बागायतीत मायनिंग कंपनीने पाणी न सोडल्याने, विहिरीतील पाणी कमी होऊन नारळ झाडांची मर झालेली आहे, असे कृषी सहाय्यक अधिकारी,वेंगुर्ला यांच्या सर्वेक्षणात निष्पन झाले होते. त्याप्रमाणे माड बागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सर्वेक्षण अहवाल व लाभार्थीनींहाय नुकसानभरपाईची अंदाजित रक्कम नमूद करून यादी बनविण्यात आली. सदर अहवाल तहसीलदार वेंगुर्ला, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना सादर करण्यात आला. मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दि. ३०/८/२०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रात ” सदर अहवालानुसार झालेली नुकसान ही नैसर्गिक आपत्तीने झालेले नाही असे निदर्शनास येते. शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीने झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीला नुकसानभरपाई दिली जाते सबब या कार्यालयाकडून याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देय होत नाही ” असे नमूद केल्याने रेडीतील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले. परंतु रेडी गावातील नारळ बागायत ही नैसर्गिक आपत्तीमूळे मृत झालेली नसून ती ठरल्याप्रमाणे मायनिंग कंपनीने पाणी न सोडल्याने परिसरातील विहिरीतील पाणी कमी झाल्याने नारळाची झाडे मृत झालेली असल्याचे तालुका कृषी अधिकारी, वेंगुर्ला यांनी दि. २३/९/२०१६ च्या अहवालात स्पष्ट नमूद केलेले असल्याने मायनिंग कंपनीच्या निष्काळजीपणामूळेच हा प्रकार घडलेला होता.
तसेच मायनिंग कंपनीने कनयाळ, म्हारतळेवाडी, हुडावाडी येथील शेतकऱ्यांच्या खाजगी शेतजमिनीमध्ये वारंवार टाकावू माती, चिखलाचे पाणी बेजबाबदारपणे सोडून शेतजमिनीत कायमस्वरूपी नापीक केलेल्या आहेत याबाबत शेतकऱ्यांनी व संस्थेच्या वतीने तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्या तक्रारीनुसार तहसीलदार, वेंगुर्ला महसूल विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी, शिरोडा यांनी पंचनामा केलेला असून त्यात शेतकऱ्यांची अंदाजे ८ ते ९ एकर क्षेत्रामध्ये चिखलयुक्त माती पसरून आल्याचा पंचनाम्यात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्या शेतजमिनींचा कृषी विभागाच्या सोबत घेऊन नव्याने मोजणी करण्याचे आदेश तहसीलदार, वेंगुर्ला यांनी दिलेले आहे. संस्थेच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
खाण कंपनीने सुरवातीपासून रेडी गावच्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीमधून तुटपुंज्या भाड्यासह लोहखनिज उत्खनन करून जो कंपनीकरिता मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा करून घेतला, त्याबदल्यात रेडी गावातील माड बागायत शेतकऱ्यांचे पाणी न सोडल्यामुळे जे नुकसान झाले, तसेच निष्काळजीपणे टाकावू माती व चिखलयुक्त पाणी सोडून शेतजमीन नापीक करून जे नुकसान केले त्याबदल्यात स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून सामाजिक दायित्व जपून सौजन्य दाखवणे हे खाण कंपनीचे कर्तव्य होते परंतु त्यांनी तो प्रामाणिकपणा रेडी गावातील नुकसानग्रस्त शेतकरी व माड बागायतदारांवर दाखवलेला नाही हे दुर्दैव आहे.
रेडी गावातील खनिज उत्खननामुळे शासनास करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. त्याच रेडी गावातील गरीब शेतकरी व माड बागायतदार हे मायनिंगमूळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहेत. खाण कंपन्यांच्या चुकांमुळे शेतकरी व माड बागायतदार हे अडचणीत आले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे तालुका कृषी अधिकारी, वेंगुर्ला यांच्या सर्वेक्षणात दिसून येते. ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यास जिल्हा परिषदेने “जिल्हा खनिकर्म निधी” मधून नवीन १२ रुग्णवाहिका जनहितार्थ खरेदी करण्याचा जसा निर्णय घेण्यात आला, त्याप्रमाणेच खाण कंपनीने बेजबाबदारपणे टाकावू माती व चिखलयुक्त पाणी शेतकऱ्यांच्या खाजगी शेतजमिनीत सोडल्याने नापीक झालेल्या शेतजमिनीचे महसूल विभागाकडून पंचनामे होऊन संभाव्य नुकसानभरपाईची रक्कम व माड बागायतदार यांचे १२८३ मृत नारळ झाडांचे रु. ३८,४९,०००/- ही रक्कम “खनिकर्म निधी” तून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना अदा करण्याबाबतची विनंती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री. उदय सामंत साहेबांना संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.
रेडी गावातील शेतकऱ्यांच्या या संवेदनशील व जिव्हाळ्याचा प्रश्नांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून लक्ष केंद्रित करून आपले स्तरावर दखल घेऊन शेतकऱ्यांना उपकृत करावे, अशी विनंती संस्थेचे जिल्हाध्यक्ष दाजी नाईक, महिला जिल्हाध्यक्ष रिमा मेस्त्री, पदाधिकारी कृष्णा मराठे, जगन्नाथ राणे, मुरलीधर राऊळ, पृथ्वीराज राणे, रविंद्र राणे, महादेव मराठे, राजेश सातोसकर, सौरभ नागोळकर, सिद्धेश शेलटे, प्रविण भगत, राजाराम@आबा चिपकर, बाळा जाधव, विनय मेस्त्री, अरुण कांबळी, दिलीप साळगावकर व इतर सदस्य व शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.