You are currently viewing प्राथमिक शिक्षकांना प्राधान्याने कोविड लसीकरण करा…

प्राथमिक शिक्षकांना प्राधान्याने कोविड लसीकरण करा…

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची पुनःश्च मागणी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत दिनांक १९/०३/२०२१ व २०/०४/२०२१ ला निवेदनाद्वारे मागणी केली होती.त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही . त्यामुळे शिक्षक वर्गात नाराजी पसरली असून संघटनेच्या वतीनेही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तसेच निवेदनाद्वारे पुनःश्च एकदा मा. जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.
कोविड १ ९ चा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे.जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णसंख्या वाढतच आहे . शासनाकडून कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात आले आहे.त्यात डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांना प्राधान्याने लस देण्यात आलेली आहे.तसेच कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या ठराविक शिक्षकांना लस देण्यात आली मात्र उर्वरित शिक्षकांना अद्याप लस देण्यात आलेली नाही .त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे . सध्या चेक पोस्ट,रेल्वे स्टेशन, आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय येथे तसेच दि. ०५/०५/२०२१ ते १४/०५/२०२१ या कालावधीत माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन,प्रत्येक व्यक्तीची कोविड १९ ची आरोग्य तपासणी करणे,लक्षणे असल्यास व्यक्तिगत तपासणी करीता पाठविणे,कोमोर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश : भेटून आरोग्य शिक्षण देण्यासाठी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.या मोहिमेतंर्गत काम करत असताना प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येणार असल्याने शिक्षकांच्या आरोग्यास धोका संभवू शकतो .त्यामुळे शिक्षकांना आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरवून सर्व शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने पुन्हा एकदा आग्रही मागणी करण्यात येत आहे, तरी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा