You are currently viewing सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन

सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी

खरीप हंगामामध्ये सोयाबीण पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरात येते.  शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल.  मागील दोन वर्षात शेतक-यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

 प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी ७ फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्‍यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी.

प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ कलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा