कोरोनामुक्त झाल्यानंतर लस घ्यावी की नको? घ्यावी तर कधी?
विशेष संपादकीय….
देशात कोरोना वेगाने फैलावत आहे. लसीकरणासाठी लसींचा तुटवडा भासत असून अनेक लोक लसींच्या प्रतीक्षेत आहेत. वयोवृद्ध आणि ४५ वर्षांवरील आजारी लोकांसाठी लसीकरण सुरू झालेले असताना आजारी असल्याचे डॉक्टर कडून प्रमाणपत्र आणण्याच्या अटीमुळे ४५ वर्षांवरील अनेक लोक लसीकरणापासून वंचित राहिले. वयोवृद्ध व्यक्तींना लस घेण्याचे आवाहन केले त्यावेळी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आणि ४५ वर्षांच्या वर लसीकरण सुरू झाल्यावर मात्र वयोवृद्ध व्यक्तींनी गर्दी सुरू केली. त्यानंतर ४५ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासला, लसच आली नसल्याने पुन्हा ४५ वर्षांवरील लोकांना लस मिळाली नाही आणि याच सावळ्या गोंधळात जिल्ह्यात कोरोना वेगाने वाढला आणि तरुणवर्ग त्याचा शिकार होण्याचे प्रमाण वाढले.
गेल्या चार दिवसांपासून १८/४४ वयोगटासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली असून अजूनही लसींचा तुटवडा मात्र भासत आहे. परंतु यातही प्रश्न राहिला तो ४५ वर्षे वरील लोकांसाठी लस उपलब्ध होणार का नाही? जिल्ह्यात अजूनही पहिली लसच मिळाली नसताना दुसरी लस घेण्याचा अवधी सुद्धा निघून गेला आहे. २८ दिवसांनी दुसरी लस घेतलीच पाहिजे, त्याचे ३० दिवस होता कामा नयेत अशी तंबी त्यावेळी दिलेली होती. आज ३० नव्हे तर ४० दिवस उलटूनही दुसऱ्या लसीकरणाचा पत्ताच नाही. विचारणा केली असता काहीजण सांगतात, उशिरा घेतली तरी चालते. मग त्यावेळी २८ दिवसच मुदत का सांगितलेली?
लसीकरण न झाल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाली, बरेचजण त्यातून सहीसलामत बाहेर पडले, परंतु आता सुरू असणाऱ्या लसीकरण मोहिमेत त्यांनी लस घ्यावी की घेऊ नये? घ्यावी तर कोरोना गेल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी? याबद्दल आरोग्य विभागाकडून किंवा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर,आरोग्यसेवकां कडून काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे कोरोनामधून मुक्त झालेले अनेक रुग्ण लस घ्यावी की घेऊ नये याबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. आरोग्य विभागाची कोरोनामुक्त झालेल्यांसाठी काही गाईड लाईन्स आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आरोग्य विभागाने याबाबत योग्य ती माहिती, त्यांची कोविड मुक्त झालेल्या लोकांच्या लसीकरणाबाबत गाईडलाईन्स जाहीर करावी आणि संभ्रम दूर करावा अशी मागणी जनतेमधून होत आहे.