नगराध्यक्षांच्या आजच्या बैठकीकडे लक्ष !
मालवण :
मालवण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूचा आग्रह प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी धरला आहे. मात्र जनता कर्फ्यू वरून मालवण मध्ये मतभेद दिसून येत असून व्यापारी संघटनेसह मनसेने जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आज पालिका सभागृहात व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीत जनता कर्फ्यू बाबत सकारात्मक निर्णय होणार का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मालवण शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने जिल्ह्यातील अन्य तालुक्या प्रमाणेच मालवण तालुक्यातही आठ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी वंदना खरमाळे आणि आमदार वैभव नाईक यांनी केले होते.
जनता कर्फ्यू पेक्षा निर्धारित वेळेत व्यापार : व्यापारी संघटनेचा निर्णय
कोरोनामुळे व्यापारी वर्ग आर्थिक तोट्यात असून आठ दिवसांचा बंद पाळून त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याने व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू न पाळता शासनाने जाहीर केल्या प्रमाणे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीत घेतला. सकाळी ७ ते ९ व्यापार होत नसून त्यामुळे ९ ते ११ यावेळेत बाजारात गर्दी होत असून शासनाने ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वेळ निर्धारित करावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी या बैठकीत केली. त्यामुळे जनता कर्फ्यूला मालवणात व्यापाऱ्यांचा विरोध राहणार असल्याने स्पष्ट झाले.
नगराध्यक्षानी बोलावली तातडीची बैठक
मालवण शहर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवण नगरपालिका सभागृहात दुपारी १२ वाजता तातडीची बैठक बोलवली आहे. आमदार वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी मालवण तहसीलदार कार्यालय येथे झालेल्या सर्व
पक्षीय बैठकीत जनता कर्फ्यु बाबत बैठक घेऊन निर्णय घ्या असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला व्यापारी प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केले आहे.
प्रशासनाच्या ॲक्शन मोड मुळे बाजारपेठेत खळबळ
जनता कर्फ्यू पाळण्याऐवजी शासनाने निर्धारित करून दिलेल्या वेळेत व्यापार सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर बुधवारी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये पहायला मिळाले. तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त पुस्तकाने पथकाने सकाळी ११ नंतर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचे हत्यार उपसले. तर यानंतर बाजारपेठेत जाऊन निर्धारित वेळेनंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी काही व्यापाऱ्यांशी अधिकाऱ्यांची शाब्दिक बाचाबाचीही झाली. मात्र कोणत्याही परिस्थितीत सकाळी अकरानंतर दुकान उघडे असल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी दिला आहे. प्रशासनाच्या या आक्रमकपणामुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली होती. उद्यापासून निर्धारित वेळेनंतर दुकाने खुली ठेवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत जनता कर्फ्यू बाबत कोणता निर्णय होणार ? व्यापारी जनता कर्फ्यूबाबत सहमती दर्शवणार का ? की प्रशासन कडक भूमिका घेऊन व्यापाऱ्यांची कोंडी करणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे..