कोरोनाच्या काळात जुगाराला चांगले दिवस आल्याचे दिसत असून पोलिसांच्या वरदहस्तानेच जुगाराच्या बैठका बसत आहेत. सगळीकडे बंद असताना, सरकारने लॉकडाऊन जाहीर केलेले असताना, आणि जिल्ह्यात कडक जनता कर्फ्यु जाहीर झाला असतानाच पोलिसांची कमाईच बंद झाली त्यामुळे जुगारासारख्या बैठका पोलिसांच्याच वरदहस्ताने भर रस्त्यात देखील बसू लागल्या आहेत.
वेंगुर्ला शहरापासून नजीकच असलेल्या दाभोली गावातील मोठ्या उतारावर रस्त्या लगतच एका बंद खोलीत जुगाराची मैफिल सजली असून जुगाराच्या या बैठकीला खुद्द वेंगुर्ला पोलिसांचा वरदहस्त लाभलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
संवाद मीडियाने आजगाव येथील परशुराम मंदिराच्या लगत बसलेल्या जुगाराच्या बैठकीची बातमी दिल्यानंतर आजगाव येथील जुगाराची बैठक बंद करण्यात आली होती. कोरोनाचे संकट जिल्ह्यात घोंगावत असताना पोलिसांकडून सर्वसामान्य लोकांना मास्क न लावल्यावर टार्गेट केलं जातं आहे, परंतु कोणतेही निर्बंध नसणाऱ्या बेकायदेशीर जुगाराच्या बैठकींसाठी मात्र छुपा पाठिंबा दिला जात आहे, कारण त्यातून तडजोड करून आपले खिशे भरता येत आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसेंदिवस मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असताना वेंगुर्ला पोलीस जुगाराच्या बैठकांना वरदहस्त देऊन नक्की काय साध्य करणार आहेत?