You are currently viewing सुमारे साडे नऊ हजार लाभार्थींनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ

सुमारे साडे नऊ हजार लाभार्थींनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ

सिंधुदुर्गनगरी 

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधाच्या कालावाधीमध्ये राज्यातील गरीब, गरजू, कामगार व हातावर पोट असणारे रोजंदारीवरील लोक यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातही या निर्णयाची अंमलबजावणी 15 एप्रिल पासून सुरू झाली. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 11 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 9 हजार 487 लाभार्थ्यांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

              जिल्ह्यातील 8 ही तालुक्यांमध्ये एकूण 12 शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी 11 शिवभोजन केंद्र ही कार्यान्वीत आहेत. त्यामध्ये जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे दोन, सावंतवाडी येथे 1, कुडाळ येथे 2, कणकवली येथे 1, मालवण येथे 1, , देवगड येथे 1, वैभववाडी येथे 1, दोडामार्ग येथे 1 आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 1 या प्रमाणे शिवभोजन केंद्र कार्यान्वीत आहेत. जिल्ह्याला एकूण 825 थाळ्यांचा इष्टांक मंजूर करण्यात आला आहे. एकूण 9 हजार 487 थाळ्यांचे वितरण या विविध शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

              मोफत शिवभोजन थाळीमुळे जिल्ह्यातील अनेक गरजू व कडक निर्बंधांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्यांना आधार मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा