You are currently viewing वैभववाडीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी….

वैभववाडीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी….

बागायतदारांमध्ये चिंता

वैभववाडी 

विजांच्या कडकडाटांसह तालुक्‍याच्या काही भागात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यात या पावसाचा जोर अधिक होता. सलग चौथ्या दिवशी मॉन्सूनपुर्व पाऊस पडला असून सतत पडणाऱ्या पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

तालुक्‍यात शनिवारी (ता.1) रात्री तालुक्‍यातील काही गावांना पावसाने अक्षरक्षः झोडपुन काढले. सह्याद्री पट्ट्यातील कुर्ली, सडुरे, नावळे, करूळ या गावांमध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. आज दुपारनंतर पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले. सायकांळी चार वाजल्यापासून विजांचा लखलखाट सुरू झाला. काही अंशी वाऱ्याचा वेग देखील वाढला होता.

त्यानंतर सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली.

करूळ घाट परिसर, भुईबावडा घाट परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. करूळ, नावळे, सडुरे या भागात देखील पाऊस झाला. याशिवाय तालुक्‍यातील इतर गावांमध्ये देखील पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. सलग चौथ्या दिवशी तालुक्‍यात मॉन्सूनपुर्व पाऊस झाल्याने चिंता व्यक्‍त होत आहे.

चिंतेचे वातावरण

या पावसाचा परिणाम या भागातील आंबा पिकांवर होणार आहे. तालुक्‍यात आंबा उशिराने परिपक्व होतो. गेल्या चार-पाच दिवसांपासुन या भागातील आंबा काढणीला सुरूवात झाली आहे; परंतु त्याचवेळ आंब्यावर पावसाचा छिडकावा होत असल्याने आंबा खराब होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा