रस्त्यावर शुकशुकाट; पुढील आठ दिवसही असेच सहकार्य करण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन!
कणकवली
कणकवलीत सुरु असलेल्या जनता कर्फ्युला आज रविवारी, दुसऱ्या दिवशीही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. शनिवार प्रमाणेच रविवारीही मेडीकल, दवाखाने वगळता शहरातील अन्य सर्व आस्थापने बंद होती. साहजिकच बाजारपेठ अगदी सुनी सुनी भासत होती.
कणकवली शहरासह तालुकाभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने नगपंचायत, सर्वपक्षिय, व्यापारी संघटना यांच्यातर्फे १ ते १० मे या कालावधीत जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी, शुक्रवारी बाजारात मोठी गर्दी झाल्याने कर्फ्यु! यशस्वी होणार का ? हा ही एक प्रश्नच होता. पण, शनिवापासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत कर्फ्युला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आज रविवारी शहरातील भाजीविक्रेते, किराणामालासह सर्व दुकाने बंदच होती. परिणामी नागरिकही बाजारात फिरकले नव्हते. अगदी मच्छिमार्केटमध्येही शुकशुकाट होता. जनता कर्फ्यु यशस्वी होत असल्याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवलीवासीयांचे आभार मानले. तर पुढील आठ दिवसही असेच सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.