You are currently viewing मुख्याधिकाऱ्यांची मटका स्टॉलवर धाड.

मुख्याधिकाऱ्यांची मटका स्टॉलवर धाड.

मटका स्टॉल सत्ताधारी गटातील नगरसेविकेच्या पतीराजांचा

राज्यात लॉकडाऊन असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडीत देखील त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे अनेकजण बाधित होत आहेत, आणि कित्येकजण मृत्युमुखी पडत आहेत. परंतु दाखवायचे दात आणि खायचे दात वेगवेगळे असलेल्या राजकारण्यांना मात्र त्याचं कोणतंही सोयरसुतक नाही, ते गैरधंदे अगदी सर्वत्र बंद असतानाही मोकटपणे स्वतःच्या तोंडावर मास्क देखील न लावता सुरू ठेवणार, आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोचवणार..
अशीच गजाल काल सावंतवाडीत घडली. दबंग मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बेकायदा नगरपालिका हद्दीत सुरू असणाऱ्या मटका धंद्यांवर धाड घालण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. या धाड सत्रातून सावंतवाडीतील सत्ताधारी गटाच्या पैशाने समृद्ध असलेल्या नगरसेविकेच्या महादेवाला देखील सोडले नाही. मटक्याच्या स्टॉलवर सापसारखे वेटोळे घालून बसलेल्या तोंडावर मास्क देखील न लावलेल्या या महादेवाला मुख्याधिकारी जावडेकर यांनी चांगलीच अद्दल घडविली. दुपारी २.३० वाजता घातलेल्या धाडीत बेकायदेशीर मटका स्टॉल सुरू ठेवल्याने ,३०००/- रुपये दंड व तोंडावर मास्क न लावल्याने ५००/- रुपये असा ३५००/- रुपये दंड वसूल केला.
सावंतवाडी नगरपालिकेत अलीकडेच दोन कर्मचारी आपल्या जीवास मुकले आहेत. सत्ताधारी गटाला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे सत्ताधारी गटाच्या अशा वर्तनावरून दिसून येत आहे. ज्यांनी जनतेला कोरोना मुक्तीसाठी विचारमंथन करून प्रबोधन केले पाहिजे, त्याच सत्ताधारी गटाच्या नगरसेविकेच्या पतीराजांनीच मटका स्टॉल उघडून तोंडावर मास्क देखील न लावता सरळ सरळ कोरोनाचाच फैलाव करण्याचा विडा तर उचलला नाही ना? असा सवाल सावंतवाडीकर जनतेला पडला आहे.
मटका स्टॉल सुरू ठेवणारा हा महादेव मटक्याच्या चिठ्ठ्या वैश्यवाडा येथील माजी नगरसेवक असलेल्या व आपल्या कामगाराबरोबर दुचाकीवर मागे बसून विक्रम वेताळ सारख्या फिरणाऱ्याच्या आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या ऑफिसमध्ये जातात. त्यामुळे सावंतवाडीच्या दबंग मुख्याधिकारी जावडेकर यांनी या गैरधंदे करणाऱ्या मटक्याच्या स्टॉल बरोबरच मटकावाल्यांच्या आलिशान बंगल्यांमध्ये सुरू असणाऱ्या ऑफिस वर देखील आपला मोर्चा वळविला पाहिजे.
एकीकडे नगराध्यक्ष पालिकेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे त्यांचेच अनुयायी नगरसेविकेचे पतीराज सर्वत्र बंद असताना बेकायदेशीर मटका स्टॉल उघडून नियमभंग करतात म्हणजे स्वतः नगराध्यक्षांचा आपल्याच कार्यकर्ते, नेत्यांवर अंमल नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे लाऊडस्पीकर लावून बाजापेठेत कानठळ्या बसतील अशा आवाजात ११.०० वाजता बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करत त्याची गंभीर दखल घ्या म्हणून नगरपालिका प्रशासन सांगत आहे, परंतु सत्ताधारी गटाच्याच नगरसेविकेच्या घरातून नियमभंग होत असेल तर लाऊडस्पीकर वर नको परंतु नगराध्यक्ष आपल्या लोकांच्या कानात तरी असे न करण्याबाबत सांगणार आहेत की नाही?

प्रतिक्रिया व्यक्त करा