You are currently viewing व्हेंटिलेटर व अत्यावश्यक आरोग्य सुविधायुक्त कोविड सेंटर मालवणात सुरू करा….

व्हेंटिलेटर व अत्यावश्यक आरोग्य सुविधायुक्त कोविड सेंटर मालवणात सुरू करा….

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या प्रशासनास सूचना

कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरची पाहणी

मालवण :

कोविड केअर सेंटर येथे बेडची संख्या १०० करा. तसेच अत्यावश्यक स्थितीतील रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह अन्य अत्यावश्यक आरोग्य सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मालवण तालुक्यात आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करा अश्या सूचना खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनास दिल्या आहेत. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे.

मालवण तालुक्यातील कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा खासदार राऊत व आमदार नाईक यांनी घेतला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री, सार्वजनिक बांधकाम अभियंता नितीन दाणे, जिल्हापरिषद सदस्य हरी खोबरेकर, कुंभारमाठ सरपंच प्रमोद भोगावकर आदी उपस्थित होते.

कोविड सेंटर येथील रुग्णांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेण्यात आली. आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्याकडून रुग्णांचा व सेवा सुविधांचा आढावा घेण्यात आला. शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींचे वसतिगृह येथे असलेल्या या कोविड सेंटरमध्ये ७५ बेड क्षमता आहे. सध्यस्थीतीत ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र आवश्यकता भासल्यास याठिकाणी २५ बेड वाढवा. तसेच लगतच्या मुलांच्या वसतिगृह इमारतीतही रुग्णांसाठी बेडची व आरोग्य सुविधांची व्यवस्था करा. अश्या सूचना खासदार राऊत व आमदार नाईक यांनी प्रशासनास केल्या. आरोग्य कर्मचारी उपलब्धतेबाबत वरिष्ठांशी बोलून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी तीन इमारतींची पाहणी

अत्यावश्यक स्थितीतील रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह अन्य आरोग्य सुविधायुक्त १० ते २० बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मालवण तालुक्यात गरजेचे असल्याचे खासदार राऊत, आमदार नाईक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याशीही याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार तहसीलदार अजय पाटणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री व पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी शहरातील मालवण नगरपालिका मालकीच्या दोन इमारतींची पाहणी केली. तसेच तालुक्यात अन्य एका इमारतीची पाहणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्याने व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जागेची निश्चिती होणार असल्याचे तहसीलदार यांनी माहिती देताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा