सावंतवाडी तहसीलदारांच्या सुचना
बांदा
गोव्यात कामासाठी जाणार्या युवक युवतींना ई-पाससाठी अडवणूक करू नये. पुढील दोन-तीन दिवस त्यांना प्रवासासाठी सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामावरील कंपनीचे ओळखपत्र, आधारकार्ड किंवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राचा दाखला दाखविल्यानंतर त्यांना तपासणी नाक्यावर सुट देण्यात यावी अशा सूचना सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बांदा-सटमटवाडी तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांना दिल्या. यासंदर्भात भाजपच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर बांदा येथे आजपासून ई-पासची अमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे दररोज गोव्यात ये-जा करणाऱ्या तरुणांसमोर संभ्रमावस्था निर्माण झाली होती. रविवारी बांदा येथील तपासणी नाक्यावर गोव्यात जाणाऱ्या तरुणांनी सरपंच अक्रम खान व उपसभापती शीतल राऊळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार म्हात्रे यांची भेट घेतली. त्यावेळी या तरुणांनी आपली कैफियत मांडली. यावेळी तहसीलदार म्हात्रे यांनी तपासणी नाक्यावरील सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांना गोव्यात नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या तरुणांना पुढील ३ दिवस कंपनीचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड पाहून सोडावे. त्यांची अडवणूक करू नये अशा सूचना दिल्या.