न्यायमूर्ती नथालापती व्यंकट उर्फ एनव्ही रमणा यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवन येथे सकाळी 11 वाजता सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती या प्रसंगी उपस्थित होते. 23 एप्रिलला माजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे निवृत्त झाले आहेत. तर सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांचा कार्यकाल पुढचे 16 महिने असणार आहे. रमणा देशाचे 48वे सरन्यायाधीश असणार आहेत.
आंध्रप्रदेश मधील कृष्णा या जिल्ह्यात पोन्नावरम या गावात एनव्ही रमणा यांचा जन्म झाला. मृदुभाषी स्वभाव असलेल्या एनव्ही रमणा यांनी 1983 साली आपल्या वकिलीची सुरुवात केली. त्यांनी केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील तसेच केंद्रीय प्रशासनिक अधिकरणामध्ये रेल्वेसाठी स्थायी वकील म्हणून काम केलंय. 2000 साली ते आंध्र प्रदेशच्या स्थायी न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये एनव्ही रमणा यांनी भाग घेतला. दिल्ली उच्च न्यायालयात 2013 साली त्यांची नियुक्ती मुख्य न्यायाधीश म्हणून झाली. तर 2014 साली सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून रमणा यांनी काम सुरु केलं.
एनव्ही रमणा यांनी गेल्या काही वर्षात अनेक महत्वपूर्ण खटल्यांचा निकाल दिला. यात जम्मू काश्मिरला इंटरनेट सुविधा पुन्हा देण्याचा निर्णयाचा समावेश होता. एनव्ही रमणा यांचा सरन्यायाधीशांचे कार्यालय माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली आणण्याचा जो निर्णय देण्यात आला, तो निर्णय देणाऱ्या बेन्चमध्ये समावेश होता.