बेड मिळत नसल्याने दिवसभर सैरावैरा फिरल्यानंतर, अॅम्ब्युलन्स थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आली. रुग्णाचे नातेवाईक यांची हतबलता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांच्या आक्रमकतेमुळे, रुग्णाला ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला. बुलडाण्यात हा प्रकार घडला.
औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील अनुसयाबाई गवार या महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना आज बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्याठिकाणी रॅपिड टेस्ट केली, मात्र ती निगेटिव्ह आली. त्यांना न्यूमोनिया असल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे त्याठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने त्यांना बुलडाणा येथे पाठवले.
मात्र दिवसभर फिरुनही कुठेही त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हता. सकाळी 11 पासून अॅम्ब्युलन्स त्यांना घेऊन शहरभर फिरत होती. संध्याकाळी साडेचारपर्यंत शहरातील 7-8 रुग्णालयं पालथी घातली. मात्र त्यांना ऑक्सिजन बेड मिळाला नाही.
शेवटी त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अॅम्बुलन्स थेट बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नेली. यावेळी प्रशासनात एकच खळबळ उडाली. ही बाब स्वाभिमानीच्या रवीकांत तुपकर यांना कळताच त्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला.