आमदार कपिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
तळेरे
राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराबद्दल आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून चर्चा केली होती. शालार्थमध्ये बदल होईपर्यंत प्रचलित पद्धतीनुसार वेतन करण्याची विनंती केली होती. आज अखेर त्यासंदर्भात हालचाल होऊन शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगारचा मार्ग मोकळा झाला आहे,अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी दिली आहे.
शालार्थ प्रणालीमध्ये बदल न झाल्यामुळे राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार थांबले होते. यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची परवानगी घेतल्यानंतर वित्त विभागाने तशी तात्काळ परवानगी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार आज शिक्षण विभागाला पुढील दोन महिन्यांपर्यंत शालार्थमध्ये बदल करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे पगार वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. कोषागार कार्यालयाने आज शिक्षण विभागाची बिलं स्वीकारली. उद्या शनिवार असल्यामुळे सोमवारपासून पगार वितरणाला सुरवात होईल, पुढील दोन, तीन दिवसात ते शिक्षकांच्या खात्यावरही जमा होतील, असंही सुभाष मोरे व संजय वेतुरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.