देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण खेळत आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला रेल्वे खात्याने अजूनही फिरवत ठेवले आहे, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला.
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेस येण्यासाठी विलंब होत असल्याची टीका केली. कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस 19 तारखेला निघाली तरी अजून काल रात्री 24 तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता ही एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. म्हणजे गाडीला जायचंय विशाखापट्टणमला आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.
या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करुन दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसं होताना दिसत नाही. ही क्रूर आणि कपटनीती आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याप्रकरणी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.
कोरोनाच्या संकटकाळात राज्यात विरोधी पक्षाकडून राजकारण सुरु आहे. हे राजकारण गरिबांच्या जीवाशी खेळणारं आहे. राज्याने केलेले चांगले काम दिसू नये, यासाठी घाणेरडं राजकारण सुरु आहे. प्राण कंठाशी आले तरी रेल्वेमार्फत ऑक्सिजन पोहोचेल का माहिती नाही. भिलाई प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवण्याचे ठरले होते. मात्र, आता आम्ही फक्त 40 टक्केच ऑक्सिजन पुरवू शकतो, असे प्लांटच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी हे सगळं सुरु आहे. कुडमुडे ज्योतिषी तारखांवर तारखा सांगत आहेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिथे ऑक्सिजनची समस्या असेल ती दूर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत आहेत. मात्र, अजून बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की पंतप्रधान मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करतील, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.