आंब्यावर चिकटवलेला स्टीकर ज्यावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्कॅन कराल त्यावेळी हा आंबा कुठच्या बागेतून आलाय? ततो आंबा पाठवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव काय? याबाबतची सर्व माहिती तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे.
सिंधुदुर्ग :
कोकणचा राजा आता क्यूआर कोडसह मैदानात उतरलाय. म्हणजे काय? म्हणजे आंब्यावर चिकटवलेला स्टीकर ज्यावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्कॅन कराल त्यावेळी हा आंबा कुठच्या बागेतून आलाय? त्या बागेला जीआय प्रमाणपत्र आहे का? तो आंबा पाठवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव काय? तो दिसतो कसा, राहतो कुठे? त्याचा मोबाईल नंबर काय ? त्याचं पॅक हाउस कसं आहे ? त्याचं रायपनिंग चेंबर ( आंबा पिकवणारी यंत्रणा ) कसं आहे? याबाबतची सर्व माहिती तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. इतकंच नाही तर तो आंबा कोणत्या दिवशी पॅक केलाय ही तारीखही दिसणार आहे .आणि ती सुध्दा प्रत्येक आंब्याची! यामुळे काय होणार आहे? तर कोकणच्या हापूसला GI मानांकन मिळूनही हापूसची जी भेसळ सुरु आहे ती रोखायला मदत होणार आहे. सध्या सिंधुदुर्गातले तीन आणि रत्नागिरीतले तीन असे सहा बागायतदार हा QR कोड वापरून आंबा बाजारात पाठवू लागले आहेत. थोडक्यात कोकणच्या राजाला आता त्याचं आधार कार्ड मिळालय.