शेर्ले येथील घटना; स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी, चौकशीची मागणी…
बांदा
कोरोनाच्या जैविक महामारीचा संसर्ग वाढत असताना शासन काळजी घेण्याबाबत जनजागृती करत आहे. गतवर्षी कास-शेर्ले सीमेवर कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. आज सायंकाळी या इमारतीची साफसफाई करताना कोविड बाधित रुग्णांनी वापरलेल्या वस्तू व साहित्य उघड्यावर टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सायंकाळी कास-शेर्ले सीमेवर सुरू करण्यात आलेल्या कोविड केंद्राच्या ईमारतीची साफसफाई करण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. याठिकाणी तिन ते चार सफाई कामगार सोबत होते.
इमारतीची पुर्णपणे साफसफाई करुन यापूर्वी वापरलेल्या कोविडच्या वस्तू व साहित्य सफाई कामगाराने मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एकत्रित उघड्यावर ठेवल्या व आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी याला विरोध करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
एकिकडे करोनाच्या दहशतीने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असताना याबाबत प्रशासन हलगर्जीपणा दाखवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.