इतर गाड्याच्या प्रवाशांनाही केले क्वारंटाईन
प्रशासनाचा सावळा गोंधळ : प्रवाशांमध्ये संताप
सावंतवाडी
कोकण रेल्वेच्या दादर-सावंतवाडी गाडीने प्रवास करणाऱ्या कुडाळ येथील प्रवाशाचे कुडाळ रेल्वे स्टेशन वर उतरल्या नंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. या प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आरोग्य प्रशासनाकडून कोविड टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य प्रशासनासह रेल्वे प्रशासनही गडबडले.
विशेष म्हणजे हा प्रवासी दादर-सावंतवाडी गाडीतून आलेला असतानाही त्या आधी आलेल्या हॉलिडे स्पेशल गाडीतील प्रवाशांनाही घरी क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देत त्यांची टेस्ट करणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या सावळ्या गोंधळाचा फटका इतर गाड्यांमधून शनिवारी प्रवास करून आलेल्या प्रवाशांना बसला असून त्यांना फुकटचा मनस्ताप होत असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला आहे.