पालकमंत्र्यांचा इशारा ; बाजारपेठा वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या…
वेंगुर्ला
गेल्या दोन वर्षात सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यांमध्ये कोविड पॉझिटीव्ह होऊन रुग्ण दगावण्याची सर्वात जास्त संख्या सावंतवाडी तालुक्यामध्ये आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यापुढे जिल्ह्यात अनावश्यक फिरणा-यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत केले.
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीन तालुक्यातील कोविड संदर्भातील आढावा घेण्यासाठीची बैठक वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहात आज पार पाडली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री सामंत बोलत होते. या आढावा बैठकीस खासदार विनायक राऊत, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार प्रविण लोकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, सभापती अनुश्री कांबळी, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच आमदार दीपक केसरकर ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी सामंत बोलताना म्हणाले की, कोविडच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन प्लॉण्ट जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार केसरकर यांनी आमदार निधीतून सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यांना शववाहिनी देण्याचे मान्य केले आहे. वेंगुर्ला नगरपालिकेकडे १२व्या वित्त आयोगाच्या व्याजातून १२ लाख रुपये शिल्लक आहेत. यातून त्यांनी रुग्णवाहिका घेण्याचे ठरविले असून त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या दुस-या लाटेशी लढणे आवश्यक आहे.
पालकमंत्री सामंत तिन्ही तालुक्यातील कोविडच्या आढाव्याची माहिती देताना म्हणाले की, सावंतवाडी तालुक्यात आत्तापर्यंत २३ हजार १०२ कोरोना टेस्ट झाल्या यात १२२५ पॉझिटीव्ह आले असून आजरोजी १३८ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. तर आत्तापर्यंत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता आलेल्या दुस-या कोविडच्या लाटेला परतविण्याच्या दृष्टीने २१५ बेड तयार करण्यात आल्या आहेत. वेंगुर्ला तालुक्यामध्ये आतापर्यंत ८ हजार ७११ जणांची टेस्टझाली असून यात ७१२ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यात ५ हजार ५९७ जणांची टेस्ट झाली असून यात ५२१ पॉझिटीव्ह तर पहिल्या लाटेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
सावंतवाडीमध्ये पहिल्या टप्प्यात १० हजार ०८८ तर दुस-या टप्प्यात १२८८ डोस देण्यात आले. यात १२७० डोस अद्यापपर्यंत शिल्लक आहेत. वेंगुर्ल्यात सुमारे ८ ते ९ हजार लसीकरण करण्यात आले. यातील ६०० डोस शिल्लक आहेत. तर दोडामार्गमध्ये ५ हजार लोकांना लसीकरण झाले असून ९५० डोस असे मिळून तिन्ही तालुक्यात ३२२० डोस आजपर्यंत शिल्लक आहेत. हे शिल्लक डोस दोन दिवसांत संपवावेत अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
९० टक्के नागरीक सर्व नियमांचे पालन करतात. १० टक्के लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यातील २ ते ३ टक्के हे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेले असतात व इतर लोक अनावश्यक कारणांसाठी फिरत असतात. यापुढे जिल्ह्यात अन्यावश्यक जे रस्त्यावर फिरताना दिसतील त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे व त्याची सुरुवात आजपासून झाली आहे. कुडाळमध्ये आज अनावश्यक फिरणा-या १२ जणांच्या टेस्ट झाल्या असून यात एक व्यक्ती पॉझिटीव्ह तर कणकवली येथे १४ टेस्ट झाल्या यात दोन पॉझिटीव्ह आल्या. त्यामुळेच जिल्ह्यात ग्रामीण भागातही आता कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे आता बंधन करणं गरजेचे असल्याने या कारवाया होत आहेत. दोडामार्गतील जे लोक कामानिमित्त गोव्यात जातात त्यांची आता दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे सर्व अधिकार प्रांताधिकारी यांना दिले आहे.बाजारपेठा किती वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात या संदर्भात प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष या सर्वांनी एकत्रित बैठक घेऊन कोविड वाढणार नाही याबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा. याला आमचा पाठींबा असेल अशी माहिती पालकमंत्री यांनी दिली. ग्रामकृती दलाच्या बैठका तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तातडीने घ्याव्यात. सरपंच संघटनेच्या सर्व पदाधिका-यांशी आपली चर्चा झाली असून पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने आपण सहकार्य करु असा शब्द त्यांनी दिला आहे. नविन शिवभोजन थाळी चालू करण्यासाठी पुढे येण-यांना आपण पाठींबा देऊ असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.