सिंधुदुर्ग
देशभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षाचं काय?, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठं भाष्य केलं आहे.
अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. जिथं नेटवर्क पोहोचत नाही तिथं ऑफलाईन परीक्षा घेणार. तसेच परीक्षा कशा घ्यायच्या हा त्या-त्या विद्यापीठाचा निर्णय आहे, असं सामंत यांनी म्हटलंय.
उदय सामंत काय म्हणाले ?
“राज्यात कोरोना वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत आहेत. त्यांच्या निर्णयाचं स्वागतच आहे. राज्यात अकृषी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. ज्या ठिकाणी नेटवर्क पोहोचत नाही तिथं ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा कशा घ्यायच्या हा त्या-त्या विद्यापीठाचा निर्णय आहे. सोलापूरसारख्या विद्यापीठात परीक्षा घेऊन झाल्या आहेत. तेथे ते निकालापर्यंत पोहोचले आहेत. सोलपूर विद्यापीठाने पूर्ण तयार केली आहे,” असं उदय सामंत म्हणाले.
कोकणात यायचं असेल तर चाचणी करा
यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि शिक्षकांच्या लसीकरणावर भाष्य केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांच्या लसीकरणास आम्ही याआधीच सुरुवात केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत शिकवणाऱ्या शिक्षकांना लस देण्यासाठी सुरुवात झाली आहे. सध्यातरी जिल्हा बंदी लावण्यात आली नाहीये. सार्वजनिक वाहतूक सुरू आहे. पण प्रवास करण्याकरिता कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. ज्यांना कोकणात प्रवास करायचा असेल तर त्यांनी आधी कोरोना चाचणी करावी,” असे उदय सामंत म्हणाले.