हिंगणघाट
शहरातीलल एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी एका खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात सदर डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दिली असून संबंधितांवर कारवाई न झाल्यास १४ एप्रिलपासून आयएमएच्यावतीने बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली
स्थानिक निशानपुरा वार्ड येथील एका कोरोनाबाधित रुग्णास दुपारी स्थानिक कोठारी हॉस्पिटल येथे उपचारार्थ आणण्यात आले.
यावेळी रुग्ण दगावला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या मृतकाचे नातेवाईकाने डॉ. निर्मेश कोठारी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी आरोपीस अटक करीत योग्य कारवाई न केल्यास खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्णसेवा बंद करण्याची चेतावणी पोलिस प्रशासनास दिली आहे.
वृत लिहिस्तोवर रात्री नऊ वाजेपर्यंत हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे आयएमएचे सचिव राहुल मरोठी यांच्यासह सगळे डॉक्टर तसेच प्रतिष्ठीतांची मोठी गर्दी हिंगणघाट पोलिस स्टेशनला जमा झालेली दिसली. तसेच पोलिस कारवाई सुरुच होती.