पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांचा पुढाकार
सावंतवाडी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत याच्या प्रयत्नातून सोनुर्ली वेत्ये भागात दगड खाणीवर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची आज आरोग्य यंत्रणेकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. माजगाव पंचायत समिती मतदारसंघांमध्ये सोनुर्ली वेत्ये या गावात सुरू असलेल्या दगड खाणी वर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार काम करत आहेत तसेच गोवा राज्यातील डंपर चालक मालक यांचा या भागात नेहमीच वावर असतो सद्य स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच नजीकच्या गोवा राज्यातही कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत असून, दिवसेंदिवस रुग्ण संख्येचा वाढता आकडा येथील प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पंचायत समिती सदस्य श्री सावंत यांनी दगड खाणी वरील कामगारांची निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेतली. श्री सावंत यांनी पुढाकार घेत केलेल्या या तपासणीबाबत दोन्ही गावातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दर पंधरा दिवसांनी किंवा आठ दिवसानी या ठिकाणी तपासणी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.