कोरोनाचे संकट वाढत असताना राज्यात लॉकडाऊनची तयारी पूर्ण झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आता रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे आरोग्य सुविधा मिळत नाहीत. परिणामी यावर उपाय म्हणून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. लॉकडाऊन जाहीर केला जाणार असला तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. मात्र, विनाकारण घराबाहेर पडण्यांवर कडक निर्बंध असतील. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊनबाबत अनेक संभ्रम आहेत. एकीकडे लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध आहे तर लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचा एक मतप्रवाह आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णांना बेड आणि उपचारही मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली होती.