You are currently viewing दबलेली सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणा आणि दाबले जाणारे सामान्य जनतेचे संशय!!

दबलेली सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणा आणि दाबले जाणारे सामान्य जनतेचे संशय!!

जीवन-मरणाच्या प्रश्नावर उत्तरे द्यायला प्रशासनाला वेळ कधी मिळणार??

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील एक व्हिडिओ नुकताच व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर आरोग्य यंत्रणा अथवा जिल्हाधिकारी यांचे अधिकृत असे कोणतेही स्पष्टीकरण अद्याप माझ्यातरी वाचनात आलेले नाही. पण तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्हायरल करणारे हे आरोग्ययंत्रणेला नाहक त्रास देणारे कोणीतरी नतद्रष्ट आहेत आणि त्यांचे हे कृत्य जणू राष्ट्रद्रोह करणारे आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया काही जणांकडून येऊ लागल्या आहेत. शेवटी कितीही झाले तरी आपल्या शासनाच्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे येऊ न देणे हे काही जणांचे नैतिक कर्तव्य आहेच, आणि त्याला अनुसरून ते आपले काम करत आहेत. त्यामुळे वाद-प्रतिवाद याच्या पलीकडे जात सर्वसामान्य जनतेच्या जीवित आणि वित्त रक्षणासाठी जे करणे आवश्यक आहे, ते करणे योग्य समजतो. आणि त्यासाठी कोणाला काहीही वाटले, तरी जे योग्य आहे, ते जनतेसमोर आणि शासन-प्रशासनासमोर आणावेत लागेल.

हा व्हिडीओ पाहून कोणीही सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झालाच पाहिजे. आधीच शासकीय रुग्णालये किती विश्वासार्हता जपताहेत हा स्वतंत्र विषय आहे. पण अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणत सर्वसामान्यांना लाथा खाण्याशिवाय पर्यायही नाही. गेल्या वर्षी जिल्हाभर रस्तोनरस्ते, गल्लीबोळ धुवून सॅनिटराईज केले जात असताना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात मात्र कोरोना पेशंट असलेल्या ठिकाणच्या संडास बाथरूमच्या दुर्दशेचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ते पाहता लाखो रुपये खर्चून प्रबोधन फक्त जनतेचेच करायचे असते का, हा प्रश्न निरुत्तरीतच राहिला होता. आता एक वर्ष लोटले, तरीही पुन्हा जनतेच्या मनातल्या संशयाना उत्तर देण्यासही वेळ नसेल, तर अशा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओना बदनामी कसे म्हणता येईल? आपली आरोग्य यंत्रणा गेली वर्षभर सातत्याने काम करत आहेत. आज त्यांचीही मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. एवढा मोठा ताण पडूनही त्यांच्याकडून कोणीही कुरबुर होत नाही, अशा प्रतिक्रिया निश्चित योग्य आहेत. अनेकांचे काम कौतुकास्पद आहेच, नाकारण्याचा सवालच येत नाही. पण त्यातही शुक्राचार्य आहेतच की झारीतल्या प्रवाहात ठाण मांडून बसलेले! त्यामुळे जनतेच्या शंकांना उत्तर देण्याएवढाही वेळ आरोग्य यंत्रणेकडे नाही हे सांगणे कितपत संयुक्तिक?

माझ्या प्रतिक्रियेनंतर जांभवड्यातील डॉ. प्रशांत मडव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इतर अन्य प्रतिक्रियांपेक्षा एक डॉक्टर म्हणून त्यांचीच वेळात वेळ काढून दिलेली प्रतिक्रिया मोलाची वाटते. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात –

“सिव्हिल हॉस्पिटलमधील त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल थोडेसे….
हॉस्पिटलमध्ये वापरात येणाऱ्या वस्तू दोन प्रकारात मोडतात. एक म्हणजे डिस्पोजेबल आणि दुसऱ्या रि-युजेबल! कोविड रुग्णांसाठी वापरत असलेल्या डिस्पोजेबल वस्तू या डिस्पोजेबल बॅग टाकण्यापूर्वी त्याचे निर्जंतूकीकरण १% सोडियम हाइपोमध्ये १५ मिनिटे ठेवून मगच ते डिस्पोजल बॅगेत टाकले जाते. जे रियुजेबल कॅथेड्रल किंवा अन्य वस्तू असतात त्या १५ मिनिटे १% सोडियम हाइपो. मध्ये ठेवून त्याचा वापर परत केला जातो. परंतु त्या वापरताना (ऊदा. Nasal cannula) प्रत्येक वेळी नवीन viral filter वापरले जातात. या सर्व गोष्टी वॉर्ड बॉयला माहित असणे आवश्यक नसते. आपण असे व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी तेथील जबाबदार अधिकाऱ्यांशी माहिती करून घेतली तर ते कधीपण चांगले. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. त्यामुळे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर उगाच दडपण आणण्यापेक्षा त्यांना मदतीचा हात देवूया , त्यांना सहकार्य करूया. ही वेळ एकत्रपणे काम करून संकटांचा सामना करायची आहे…”

त्यांची प्रतिक्रिया भावनात्मक असली आणि लढणाऱ्या कर्मचारी वर्गाला साथ देणारी आहे. निश्चितच ती एका अर्थाने योग्य असली, तरीही दुसरीकडे जनतेच्या मनातल्या शंकेचे निरसन त्याचवेळी का झाले नाही. वार्डबॉयला काही समजत नसेल, तर अन्य जबाबदार व्यक्ती तिथे नव्हत्या का? त्या का गोंधळलेल्या दिसतात, किंवा योग्य उत्तर देण्याचा मनस्थितीत दिसत नाहीत. समोर येऊन व्हिडीओ काढत स्पष्टीकरण मागणारा जो कोणी युवक आहे, तो आरोग्य यंत्रणेला त्रासदायक, खच्चीकरण करणारा का वाटावा?

डॉ.प्रशांत मडव यांचे उत्तर हे अधिकृतरित्या प्रशासनाने दिलेले उत्तर नसले तरीही जे काही प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होतात, ते ही मांडणे गरजेचे समजतो. म्हणजे विचार आणि अभ्यास करून प्रशासनाला त्यावर बोलणे आणि सुधारणा करणे शक्य होईल. शेवटी आरोग्य यंत्रणा ही जनतेची शत्रू आहे, किंवा आरोग्यसेवक काम करत नाहीत असे आमचे म्हणणे नसले तरीही या यंत्रणेची थोडीशीही बेफिकीरी अनेकांना जीवितावर बेतू शकते, यासाठी ती रोखून योग्य सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करणे हाच आमचा हेतू आहे.

डॉ.मडव सांगतात त्याप्रमाणे, या दोन प्रकारात मोडणाऱ्या वस्तू सामान्य जनतेला माहीत आहेत का ? त्या जर अशा प्रकारे बिनधास्त समोरुन नेऊन वापरत असतील किंवा तशा प्रकारे हाताळत असतील, तर त्यातून जनतेच्या किंवा रुग्णाच्या मनात भीती उत्पन्न होईल की नाही? रुग्णाची मानसिक अवस्था कशी होईल? अशा गैरसमज आणि संशयातूनही रुग्णांचे मानसिक आरोग्य बिघडणार असेल तर त्याला उपचारांचा उपयोग होईल का ? आणि जर बिनधास्तपणे जर योग्य असे वैद्यकीय प्रोटोकॉल तोडून हे चालत असेल तर मग पाठीमागे काय चालत असेल याची कल्पना कुणी केली तर त्यात गैर काही आहे का ?

वैद्यकीय स्टाफ लढतो आहे हे मान्य केले तरी लढणाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनेही लढू नये. आता वर्ष झालंय कोरोनाला, इतकी बेजबाबदार वृत्ती ठिक नाही.

जर डिस्पोज करायच्या वस्तू वेगळ्या असतील तर त्या वॉर्डमधून अशा हातातून उघडपणे फिरवणार का? असे फिरवणे सुरक्षीत आहे का? काय संहिता आहे अशा दुषित वस्तू हाताळण्यासाठी? अशा हातातून फिरवता येतात का त्या, खेळण्यासारख्या?

या वस्तु कॅथेटर आहेत का? कोणकोणत्या प्रकारच्या वस्तुंचे पुन:निर्जंतूकीकरण केले जाते, असे किती केले गेले आहे, त्याचे रजिस्टर उपलब्ध असेलच. सोबत जागतिक आरोग्य संघटना किंवा भारत सरकारचे मार्गदर्शक पत्र असेलच. भंगाराप्रमाणे डाळून अशा वस्तू ठेवतात का ? हव्या तेव्हा उचलून त्या तशाच त्यातून उचलून फिरवता येतात का?लेखी स्वरुपात या वस्तू धुवून (निर्जंतूक करून) वापरा अशा आदेशाचे पत्र आरोग्य यंत्रणेने त्या युवकाच्या तोंडावर मारले असते, तर एवढा हंगामा झालाच नसता. पण तशा आदेशाचे कोणाचे पत्र आहे का, की लढाई म्हंटल्यावर वॉर्डबॉयलाच सेनापतीचे अधिकार प्राप्त होतात?व्हिडीओमध्ये जेव्हा तो युवक त्या यंत्रणेतल्या महिलेला ही स्थिती सांगतो, तेव्हा त्या म्हणतात- मी आता आलेय ! याचा अर्थ काय? तुम्ही या कधीही, पण कामाच्या पद्धतीचा प्रॉटोकॉल काय आता तयार केलेला आहे का? ज्या नळाखाली तो वार्डबॉय नळी धुतोय, त्यात १%सोडियम हायपोक्लोराईड आहे? ज्या रुममध्ये या वस्तु ठेवल्यात किंवा टाकल्यात त्या रुमचं नाव काय? हा रुम अशासाठी वापरतात का ? हा रुम इन्फेक्टेड होणार नाही का? व्हिडीओतील व्यक्तीने रोखल्यावर कुठल्या जबाबदार व्यक्तीने दखल घेतली व पुढील कार्यवाही केली? कितीतरी प्रश्न निर्माण होतात.

या सगळ्या प्रश्नांची उत्तर मागणे म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप आहे का? हे आरोग्य यंत्रणेचे खच्चीकरण आहे का?

मुळात, वैद्यकीय परिभाषा ही सामान्य लोकांच्या डोक्यावरून जाणारी असते. त्यामुळे असेच चार आठ वैद्यकीय शब्द वापरून स्पष्टीकरण दिले, तरी सामान्यजन तुम्हाला हवे तसे तात्काळ बॅकफुटला येतील. पण जिल्हा वा आरोग्य प्रशासनाने तेवढे तरी करावे. डॉक्टर मडव यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. पण तरीही एक सूचना करावीशी वाटते. डॉक्टर त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात की “व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी तेथील जबाबदार अधिकाऱ्याशी माहिती करून घेतली असती तर चांगलं झालं असतं!”

वैद्यकीय परिभाषा त्या युवकाला भले समजली नसेल असेही गृहीत धरूया. त्याठिकाणी तो तक्रार करताना डॉ.गोडबोले, डॉ. शाम पाटील हे उत्तर न देऊ शकलेले वैद्यकीय अधिकारी हे ही जबाबदार नाहीत असेही एकवेळ पकडून चालू. वार्डबॉयला कशातलं काही कळत नाही म्हणता, पण बाकी अख्ख्य हॉस्पिटल तिथे क्लास फोर कर्मचारी कसे डीनच्या तोऱ्यात चालवतात हेही तुम्हाला माहीत असण्याची गरज नाहीय. पण या सगळ्यात त्या प्रश्न मांडणाऱ्या युवकाचे प्रामाणिक प्रयत्न किती थिटे पडले, हे व्हिडीओ पाहून आमच्या लक्षात आलेच आहे. पण डॉक्टर, व्हिडीओ पहिल्यानंतर तुम्हाला असे का नाही वाटले की आपण एक डॉक्टर म्हणून त्या जबाबदार अधिकाऱ्याकडून नेमकी परिस्थिती जाणून घ्यावी, आणि त्याच्या हवाल्यानेच मग “सत्य परिस्थिती”ची अधिक माहिती जनतेला द्यावी. तुम्हालाही जर तर च्या भाषेतच अंदाज काढत “सत्य परिस्थिती” मांडावीशी वाटली? आरोग्य यंत्रणेबद्दल जर कोण शंका मांडत असेल, तर ती आधी मोडूनच काढायची असे वैद्यकीय वर्तुळात आधीच ठरले आहे का? सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात चार दिवसाच्या मुलीला झालेल्या कोरोनाबाबत आणि तिथे घेतलेल्या काळजीबद्दल आरोग्य यंत्रणेला तोंड उघडायला अद्याप वेळ मिळालेला नाही. तिथून प्रसार झाला नसेल का? कोणी बोलले तर ते आरोग्य यंत्रणा खच्ची करणारे गुन्हेगार का? जनतेप्रती कोणाचीच काही जबाबदारी नाही?

असे असेल, तर शेकडो टीकेच्या प्रतिक्रिया आम्ही सहन करू, प्रशासकीय दबाव झेलू, भले “महाराष्ट्रद्रोही” ही अलीकडील विशेष राजकीय पदवी स्वीकारून होणाऱ्या सगळ्या परिणामांना सामोरे जाऊ, पण….

“यंत्रणा कामाखाली दबली आहे” या कारणापायी सामान्य जनतेला मरणाच्या वरवंट्याखाली अजिबात दबू देणार नाही. सगळ्या बेफिकीरीच्या मुळापर्यंत जाऊन सत्य बाहेर काढू!!

——-अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग
9422957575

प्रतिक्रिया व्यक्त करा