कधी नव्हे ते जग,
इतके जवळ आले.
पत्राने पोचणारे निरोप,
शब्दात ऐकू येऊ लागले.
सणासुदीला दिसणारे चेहरे,
व्हिडीओ कॉलवर दिसू लागले.
खरेखोटे भाव चेहऱ्यावरचे,
आपोआप समजून चुकले.
माहिती कानाकोपऱ्याची,
टिचकीत मिळू लागली.
हिशोब लाखो करोडोंचे,
बोटे क्षणात सोडवून गेली.
रडणारी बाळं देखील,
मोबाईल गप्प करतात.
आईची भूमिका सुद्धा,
कधीतरी तेच निभावतात.
मोकळी पडली मैदाने,
धूळ वाऱ्यासवे उडू लागली.
मोबाईल वरच खेळांची,
स्पर्धा बसल्या जागी भरली.
ऑनलाईन अभ्यास म्हणत,
मुले मोबाईल मध्ये रमली.
प्रगती होण्यापेक्षा अभ्यासात,
बरीच मागेच पडू लागली.
चष्मे लागले, नको ते छंद जडले,
ढेऱ्या सुटल्या शरीर बेढब बनले.
नवे तंत्रज्ञान विकसित झाले,
रोगांना मात्र आमंत्रण मिळाले.
चारचौघात बसूनही माणूस,
एकलकोंडा जगायला लागला.
पर्वा नसते सोबतच्या आनंदाची,
मोबाईल हाच खरा आनंद बनला.