संपादकीय…….
गेल्या वर्षी मार्च महिन्यात आलेलं कोरोनाचे संकट वर्षभर कमी अधिक प्रमाणात सुरूच आहे. मध्यंतरी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहून बरेचसे निर्बंध उठवले गेले होते. जनजीवन सामान्य होत असलेले दिसून येत होते. परंतु गेल्या महिन्याभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे आणि गेल्यावर्षी जशी परिस्थिती होती त्यापेक्षाही भयानकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. मंत्रिमंडळाने आजच लॉक डाऊन संदर्भात काही अतिशर्ती घातलेल्या आहेत. परंतु आजही सरकारी यंत्रणा ज्याप्रमाणे गेल्यावर्षी गंभीर होती त्याप्रमाणे यावेळी गंभीर असलेली दिसत नाही.
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात अलीकडेच एक बाहेरून आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. सदर व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली असता गावी येताना त्या व्यक्तीने ज्या रिक्षातून प्रवास केला होता त्या रिक्षाचालकाचे नाव समोर आले होते, त्या रिक्षावाल्याला आरोग्य केन्द्रात टेस्ट करून रिपोर्ट येइपर्यंत गृह विलगिकरणात राहण्यास सांगितले होते. RTPCR टेस्ट चा रिपोर्ट दोन दिवसांनी भेटत असल्याने दोन दिवस विलगिकरणात राहण्यास सांगितले होते. परंतु सदरचा रिक्षावाला गावातील शिमगोत्सवात अगदी बिनदिक्कतपणे फिरला. त्यामुळे जर त्या रिक्षावाल्याला कोरोनाची लागण झाली तर त्याच्या बिनधास्त वागण्यामुळे गावातील, त्याच्या घरातील इतर व्यक्ती देखील कोरोनाचे शिकार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी कोरोना संदर्भात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते, परंतु मध्यंतरी जिल्ह्यात घसरलेली कोरोनाची टक्केवारी पाहून बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा गेला महिनाभर जलद गतीने वाढत असलेले कोरोनाचे नवे रुग्ण पाहता लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. परंतु शहरात काही प्रमाणात वगळता गावोगावी तशी खबरदारी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या रुग्ण सापडल्यास शक्यतो गृह विलगिकरणात ठेवण्यात येतो व पूर्वीसारखी जास्त खबरदारी घेतली जात नसल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे.
जिल्हावासीयांना वाढता कोरोना प्रसार रोखण्यासाठी केवळ मास्क लावून उपयोग होणार नाही तर सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक बाहेर फिरणे, हॉटेलिंग, प्रवास, पार्टी आदी बाबी टाळल्या पाहिजेत. एखाद्या वॉर्ड मध्ये अथवा वाडीत, गावात कोरोना रुग्ण मिळाल्यास आरोग्य प्रशासनाने त्याची माहिती पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासन इत्यादींना देणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा गृहवीलगिकरणात ठेवलेले संशयित बाहेर फिरून त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना देखील धोका उत्पन्न करू शकतात. न्हावेली येथे विलगिकरणात ठेवलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येवो अथवा निगेटिव्ह येवो, त्या रिक्षावाल्याने तोपर्यंत बाहेर फिरणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखेच आहे. या सर्व बाबींवर आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, गावात ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, पोलीस पाटील आदींनी जागरूक राहून योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा कोरोना आटोक्यात येणे अतिशय कठीण होऊन बसेल आणि पुन्हा एकदा गेले एक वर्ष लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागेल.
कोरोनाच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने जागरूक राहून योग्य ती उपाययोजना वेळेतच करणे आवश्यक आहे.