नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
कणकवली
दुबईच्या धर्तीवर कणकवली शहरातील गणपती साना येथे 2 कोटी 46 लाख निधी खर्चून भव्य धबधबा निर्माण करण्यात येणार आहे. 6 मीटर उंचीचा आणि 18 मीटर लांबीचा हा धबधबा बारमाही सुरू असणार आहे. हा धबधबा कणकवली शहराच्या पर्यटनाचा मानबिंदू ठरणार आहे. प्रकल्पाची तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच टेंडर निघणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली शहरातील नागरिकांनी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून 2018 साली सत्ताबदल केला. कणकवली वासियांचे विश्वस्त म्हणून नगरपंचायतच्या माध्यमातून आपण शहर विकासाचे प्रकल्प राबवत आहोत. आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुबई येथील मोहम्मद बिन रशीद यांच्या संकल्पनेतून कणकवलीत हा प्रकल्प साकारला जात आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्म , व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकल्प भावला असून प्रकल्प मंजुरीसाठी सहकार्य लाभले आहे. प्रादेशिक पर्यटनमधून हा धबधबा मंजूर झाला असून जानवली नदीच्या पूररेषेच्या वर 6 मीटर याची उंची असणार आहे.
धबधब्यात चिंब होण्याचा नैसर्गिक आनंद पर्यटक , नागरिकांना अनुभवता येणार आहे. धबधब्यासाठी वापरण्यात येणारे पाणी क्लोरोनायझेशन करून पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यांनंतर हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धबधबब्यावर पॆयटकांसाठी मोबाईल टॉयलेट आणि चेंजिग रूमही उपलब्ध केली जाणार आहे. यावेळी गटनेता संजय कामतेकर, शिक्षण- आरोग्य सभापती अभि मुसळे, नगरसेवक बाबू गायकवाड,नगरसेवक शिशिर परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, महेश सावंत उपस्थित होते.