परीक्षांचा पॅटर्न मुंबई विद्यापीठाकडून जाहीर
मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. परीक्षांचा पॅटर्न मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे. कशा पद्धतीने परीक्षा घेतल्या जातील या संदर्भातील मार्गदर्शक सूचना या पॅटर्नमध्ये देण्यात आल्या आहेत. त्यानुसार परीक्षा नियोजनाची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपण्यात आली आहे. १ ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत रेग्यूलर परीक्षा होतील. तर २५ सप्टेंबरपासून बॅकलॉकची परीक्षा होणार आहे.
क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय स्तरावर परीक्षा होतील. महाविद्यालयांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे. त्या प्रत्येक क्लस्टरमध्ये एक महाविद्यालय लीड करणार आहे. लीड महाविद्यालय क्लस्टरअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची परीक्षा नियोजनाप्रमाणे घेतील. प्रश्न पत्रिका देखील क्लस्टरनिहाय असतील. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून यासंदर्भात सूचना दिल्या जातील. ऑनलाईन बहूपर्यायी पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये अंतिम वर्ष प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, व्हिवा परीक्षा ऑनलाईन होतील. तसेच तोंडी परीक्षा फोनवरून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या असून त्या १५ सप्टेंबरपासून सुरू होतील.
सर्व थेअरी परिक्षा ५० गुणांसाठी आणि एका तासाच्या कालावधीच्या असतील. तर सर्व थेअरी परीक्षा १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमवार आधारित असतील. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घेण्यात यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा ऑफलाईन घेतली जाईल. परीक्षेच्या तयारीसाठी आणि अनुभवासाठी विद्यार्थ्यांना सॅम्पल बहूपर्यायी प्रश्न देऊन त्यांची सराव परीक्षा घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. एखादा विद्यार्थी काही कारणास्तव परीक्षा देऊ शकला नाही, तर त्याला पुन्हा संधी देण्यात येणार आहे.