You are currently viewing केवळ ३५ टक्केच निधी खर्च हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अकार्यक्षमतेचा नमुना- हरी खोबरेकर

केवळ ३५ टक्केच निधी खर्च हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अकार्यक्षमतेचा नमुना- हरी खोबरेकर

निधी खर्च करण्यात सत्ताधारी भाजप ठरले अपयशी

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला निधी प्राप्त होतो. मात्र जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाज पत्रकानुसार आतापर्यंत १८ कोटी ४० लाख निधीपैकी केवळ ८ कोटींचा निधी खर्च पडला असून ३५ टक्केच निधी खर्च झाला आहे. भाजपची सत्ता असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अकार्यक्षमतेचा हा नमुना आहे. निधी खर्च करण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरले आहे. अशी खोचक टीका शिवसेना जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी केली आहे.

नारायण राणे, नितेश राणे, भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य अनेकवेळा राज्य शासनाकडून निधी मिळत नसल्याबाबत टीका करत होते. महाविकास आघाडी सरकार निधी देत नाही असे खोटे आरोप करत होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी भरघोस निधी देऊनही सत्ताधाऱ्यांना तो खर्च करता आलेला नाही. यामुळे जनता विविध योजनांपासून वंचित राहून जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पदांच्या शर्यतीत असलेल्या भाजप सदस्यांना लोकांचा विसर पडला आहे. अखर्चित राहिलेल्या या निधीतून विविध विकास योज़ना, वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून जिल्हावासीयांना त्याचा लाभ मिळवून देणे गरजेचे होते.

मात्र नारायण राणे, नितेश राणे, भाजप जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती व सदस्य यांच्या नाकर्तेपणामुळे प्राप्त निधी पैकी अखर्चित राहिलेला निधी शासन सदरी परत जाण्याची वेळ आली आहे. हा निधी खर्च दाखविण्यासाठी आज मध्यरात्री पर्यंत आवश्यक नसलेल्या योजनांवर देखील हा निधी खर्च करण्याचे पराक्रम होणार आहेत. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होऊन निकृष्ट कामांचा फटका सर्वांनाच बसणार आहे. याला सर्वस्वी भाजप जबाबदार असणार आहे. असे हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा