You are currently viewing असा आहे सुवेझ कालव्याचा इतिहास

असा आहे सुवेझ कालव्याचा इतिहास

इजिप्त मधील सुवेझ कालवा गेल्या २३ मार्च पासून चर्चेत आला तो या कालव्यात अडकलेल्या विशालकाय जहाजामुळे आणि त्यामुळे समुद्रात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे. एव्हरग्रीन नावाचे हे विशाल जहाज आता कालव्यातून हटविले गेले असून सहा दिवस ठप्प झालेली जहाजांची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. या काळात तासाला ३ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आशिया युरोप ला जोडणारा हा कालवा व्यापारी दृष्टीने फार फार महत्वाचा मानला जातो.

गतवर्षी या कालव्यातून १९ हजार जहाजे गेली. जगातील एकूण समुद्री व्यापाराच्या १० टक्के व्यापार याच कालव्यातून होतो. विशेषतः तेल वाहतुकीसाठी हा कालवा महत्वाचा असून हा जगातील सर्वात व्यस्त समुद्री मार्ग आहे.

यामुळे आशिया युरोप मधील अंतर ६ हजार किमीने कमी झाले आहे आणि सात दिवसाचा प्रवासाचा वेळ त्यामुळे वाचतो. दररोज येथून सरासरी ५० जहाजे जातात आणि त्यातून अंदाजे ७३ हजार कोटीं किमतीच्या मालाची वाहतूक होते.

१८५४ मध्ये फ्रांस राजदूत डी लेटरेस यांनी या कालव्याच्या योजनेवर काम सुरु केले होते आणि त्यासाठी १८५८ मध्ये युनिव्हर्सल सुवेझ शिप कॅनाल कंपनी स्थापन केली गेली. कंपनीला कालवा बांधणे आणि संचालन यासाठी ९९ वर्षाचा करार करून दिला गेला होता. हा कालवा तयार झाला १८६९ मध्ये. त्यातून आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु झाली आणि इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल नसीर यांनी या कालव्याचे १९५६ मध्ये राष्ट्रीयीकरण केले. यामुळे ब्रिटीश आणि फ्रांस सरकार मध्ये हडकंप माजला कारण या दोन देशांकडे सुवेझ कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर होते. त्यांनी इजिप्तवर हल्ला करण्याची तयारी केली मात्र अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्ती केल्यावर युद्ध झाले नाही.

अर्थात या नंतर या कालव्यावर इजिप्तचा पूर्ण अधिकार आला. २६ जुलै १९५६ मध्ये कालव्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आल्याची घोषणा इजिप्तने केली तेव्हा प्रथम हा कालवा बंद राहिला. जून १९६७ मध्ये इस्रायलने इजिप्त, सिरीया आणि जॉर्डन यांच्याशी युद्ध पुकारले, ते सहा दिवस चालले. त्या काळात या कालव्यात १५ जहाजे अडकली होती. त्यापैकी एक बुडाले तर उरलेली १४ जहाजे पुढची आठ वर्षे कैदेत होती. या काळात आठ वर्षे या कालव्यामार्गे होणारा व्यापार बंद होता.

२००४, २००६ आणि २०१४ मध्ये सुद्धा या कालव्यात काही जहाजे अडकली होती आणि त्यामुळे काही दिवस कालवा बंद होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा