बांदा
मुंबई येथील आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वार्षिक कला प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील मडूरे गावातील नवोदित शिल्पकार नितेश प्रफुल्ल परीट याच्या ‘धाकल्या बहिणाबाई’ या व्यक्तिशिल्पाला सुवर्ण पदकाचा मान मिळाला. नितेशने मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयातून शिल्पकलेचे शिक्षण प्रथम श्रेणीत विशेष प्रविण्यासह पूर्ण केले असून त्यातही तो महाराष्ट्रातून प्रथम आला होता. नितेशच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आर्ट सोसायटी अॉफ इंडियाच्या कला प्रदर्शनात वास्तुशिल्पाला स्थान मिळणे मानाचे समजले जाते. या प्रदर्शनात प्रचंड स्पर्धा असते. मडूरे येथील युवा कलाकार नितेश परीट याच्या ‘धाकल्या बहिणाबाई’ या वास्तुशिल्पाला प्रदर्शनात संधी मिळाली. या वास्तुशिल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त होऊन सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. अत्यंत कमी वयात सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे.
कोविड प्रादुर्भावामुळे यावर्षीचे कला प्रदर्शन ऑनलाईन होत असून २० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत http://artsocietyofindia.org या वेब साईटवर पाहता येईल. नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बक्षीस वितरण समारंभात नितेशला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. नितेशच्या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस. बी. पोलाजी, जे जे महाविद्यालयाचे शिक्षक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.