कणकवली:
कळसुली गावात वासुदेव दळवी यांच्या घराशेजारील विहिरीत बिबट्या पडला होता. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच वन विभागाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अथक प्रयत्ना नंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.
दरम्यान भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या विहिरीत पडला. रविवारी पहाटेच्या दरम्यान ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाला बोपावण्यात आले. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र वनविभागाने या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःस्वास सोडला आहे.
वनविभागाने जीवदान देत जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असंल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.