कुडाळ
महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत महा कृषी ऊर्जा अभियान १ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीमध्ये राबवण्याबाबत महावितरण कंपनीला निर्देश देण्यात आलेले होते. सदर कृषी ऊर्जा पर्वा अंतर्गत विविध प्रकारचे १८ उपक्रम महावितरण कंपनीकडून राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळातर्फे महावितरण कार्यालय कुडाळ ते बॅ. नाथ पै. विद्यालय कुडाळ अशी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. व सदर रॅलीतून “माझे विजबिल माझी जबाबदारी” ही संकल्पना जास्तीत जास्त प्रसिद्ध होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
सदर रॅलीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन मोटर सायकल रॅली यशस्वी केली. सदर रॅली करता बॅ. नाथ पै. विद्यालयाचे संस्थाध्यक्ष श्री. गळवणकर तसेच प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. महावितरण कंपनी तर्फे संस्था अध्यक्ष श्री. गळवणकर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना “माझे वीज बिल माझी जबाबदारी” हे स्टिकर्स वाटून सदर मोहिमेमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री पाटील यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्टिकर चे वाटप करून पालकांमध्ये महावितरणला वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
२७ मार्च पर्यंत महावितरणचे ४२ कोटीची वसुली झालेली आहे. तसेच मागील दोन महिन्यापासून एकही वीज बिल भरणा केलेल्या ग्राहकांची संख्या ही ३२००० असून सदर ग्राहकांकडून अकरा कोटी रुपये अपेक्षित आहेत. सदर ग्राहकांनी स्वेच्छेने पुढे येऊन “माझे वीजबिल माझी जबाबदारी” या प्रबोधनाच्या माध्यमातून वीज बिल भरावे असे महावितरण कडून आव्हान करण्यात येत आहे. अन्यथा नाईलाजास्तव महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येईल याची नोंद सर्व ग्राहकांनी घ्यावी.