शिकून मोठे झाले तरी,
कुणी विसरत नाही शाळा.
शिकवत होते शिक्षक ज्ञान,
अन बोलत होता फळा.
बाराखडी मुळाक्षरे सारी,
आम्ही पाटीवर गिरवली.
अक्षराला दाद मिळताच,
हुशारकीची शान मिरवली.
शिक्षक होते प्रेमळ आमचे,
मुलांवर माया करायचे.
छडी हातात घेतली की,
अंग आमचेच थरथरायचे.
सकाळची प्रार्थना,मासपीटी,
दिवसभर ताजेतवाने ठेवायचे.
म्हणून तर शिकवलेले आमच्या,
अगदी कायम लक्षात रहायचे.
भले मोठे मैदान शाळेचे,
कितीतरी खेळ खेळायचे.
पिड्याची बॅट आणि गठ्ठे,
बॅट बॉलपेक्षा मोठे वाटायचे.
मधली सुट्टी म्हणजे शाळेत,
हजारो मुलांची जत्रा वाटायची.
तरीही शिस्त मात्र शाळेची,
खरंच खूप कडक असायची.
आजही आमची शाळा म्हणून,
तिचा अभिमान आम्हा वाटतो.
मिलाग्रीस हे नाव शाळेचे…
सर्वांना गर्वाने आम्ही सांगतो.
(दिपी)✒️
दीपक पटेकर.
सिंधुदुर्ग.
Waa, Khup chaan 👌