येरवडा
येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रेकॉर्ड रूमला सकाळी आग लागली. यामध्ये सर्व कागदपत्रे जाळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.
माहितीनुसार, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या शिपाई वैशाली काशीद या शाळेत हजर झाल्यानंतर इमारतीवरील सर्व मजल्यांची पाहणी करीत होत्या. यावेळी रेकॉर्डरूम मधून धूर येत असल्याचे समजले त्वरित त्यानी शाळेच्या मुख्याधिपिका वीणा ढगे यांना कळविले. त्यांनी अग्निशामक दलाला कळविले.
या आगीत शाळेतील जुने रेकॉर्ड साहित्य कागद जळून खाक झाले आहे. तिसऱ्या मजल्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू होता.
उपस्थित शिक्षक व महिला सुरक्षारक्षक यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना मैदानात घेऊन गेले. या घटनेमुळे पुन्हा एकदा शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वरच्या मजल्यावर विजेचे कनेक्शनसुद्धा नाही.त्यामुळे आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शाळेच्या आवारातील खिडक्या तसेच ग्रीलची मोडतोड झालेली आहे. त्याची दहा दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात येऊनसुद्धा त्याची तोडफोड करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात स्थानिक अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून नासधूस व गैरवापर केला जातो. शाळेच्या सुरक्षिततेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापालिका प्रशासन उदासीन आहे.
नायडू हॉस्पिटल अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर विजय भिलारे, फायरमन सुनील वाघमारे, हिरामण मोरे, भानुदास घुले दिलीप भालेराव, देवदूत वरील सेवक अमृता रुपनवर, आदित्य गुंजाळ, शिवाजी कोंढरे, चालक अनुप साबळे यांच्या पथकाने आग आटोक्यात आणली.