सिंधुदुर्ग
बुधवारीजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत असून भाजप व शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आपापल्या पक्षनेत्यांच्या ताब्यात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेना पैसे देऊन भाजपचे सदस्य फोडत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयात जाऊन जिल्हा परिषद निवडणुकीत हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी सूचना दिल्याची घटना घडली आहे. दरम्यान, दोन्ही बाजूचे सदस्य फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असून बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय घडते याची उत्कंठा ताणली गेली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये एकूण 50 सदस्य असून त्यातील 19 सदस्य शिवसेनेकडे आहेत. तर 31 सदस्य भाजपकडे आहेत. या 31 सदस्यांमध्ये राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या डॉ. अनिशा दळवी यांचा समावेश आहे. शिवसेना गेले काही दिवस जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर व्हावे यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. भाजपचे काही सदस्य शिवसेनेच्या संपर्कात असून शिवसेनेने या सदस्यांना ‘ताकद’ दिल्याची चर्चा आहे. भाजपने शिवसेनेवर पैसे देऊन सदस्य फोडत असल्याचा आरोप केला आहे. खासदार राणे आणि राजन तेली एका बाजूने आरोप करत असताना दुसर्या बाजूने शिवसेनेचे नेते मात्र उघडपणे यावर काहीही बोलले नाहीत. काहीही न बोलता रणनीती शिवसेना अवलंबत असल्याची चर्चा त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.
जिल्हा परिषदेवर 1997 सालापासून खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असून सुरुवातीला राणे यांच्या नेतृत्वाखाली 2005 सालापर्यंत शिवसेनेची त्यानंतर 2017 सालापर्यंत काँग्रेसची आणि त्यानंतर आतापर्यंत भाजपची सत्ता राहिली आहे. गेल्यावर्षी शिवसेनेने भाजपचे काही सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात यश मिळाले नव्हते. भाजपने आपले काही सदस्य सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. यावर्षी मात्र शिवसेना अधिक ताकदीने उतरल्याची चर्चा आहे.त्यामुळे यावेळी भाजपने अधिक सतर्कता बाळगल्याचे दिसते आहे. सोमवारच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे 8 सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे संशयाचे वातावरण वाढले आहे. हे सर्व सदस्य आपल्या ताब्यात असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. मात्र भाजपचे अनेक सदस्य शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरूच होती. दरम्यान भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी शिवसेनेचे सदस्यच आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत शह देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे सदस्य गोवा राज्यातील महाराष्ट्र सीमेवर असलेल्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. तर भाजपचे सदस्य पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या परिसरात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव असून या पदासाठी भाजपकडून देवगड तालुक्यातील मनस्वी घारे व सावंतवाडी तालुक्यातील उन्नती धुरी या नवीन चेहर्यांची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर काम केलेल्या संजना सावंत यांना पुन्हा संधी मिळू शकते अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान खा. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्षपदी उमेदवार कोण असेल याचे नाव लखोट्यातून येईल असे सांगितले.
शिवसेना अध्यक्षपदासाठी प्रयत्न करत असताना शिवसेनेकडूनही काही नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासोबत शिवसेनेत सामील झालेल्या कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य स्वरुपा विखाळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून आणखीही काही नावे पुढे येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पहिल्यांदाच अशाप्रकारे स्पर्धा सुरू असून जिल्हा परिषद सदस्य फोडाफोडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. बुधवारी 3 वा. निवडणुकीची विशेष सभा सुरू होणार असल्याने दोन्ही पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य त्यापूर्वी काही मिनिटेच जिल्हा परिषद भवनात प्रवेश करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे