You are currently viewing थकीत पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या तोडल्या…

थकीत पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या तोडल्या…

मालवण पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची धडक कारवाई ; पाणीपट्टी, घरपट्टी भरत नागरिकांनी कारवाई टाळण्याचे आवाहन…

मालवण

येथील पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी आजपासून धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात आज शासकीय एक व खासगी पाच अशा सहा नळजोडण्या तोडण्याची कारवाई केली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख सोनाली हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभिकर्ता राजा केरीपाळे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. यापुढेही थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी नळजोडणी बंद करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरात शासकीय तसेच खासगी नळजोडणी धारकांची मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे. संबंधितांना सातत्याने थकीत पाणीपट्टी भरण्याच्या सूचना यापूर्वी करण्यात आल्या. मात्र थकीत पाणीपट्टी भरण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी संतोष जिरगे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख सोनाली हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून थकीत पाणीपट्टी धारकांची नळजोडणी तोडण्याची धडक कारवाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात आज तालुका भूमि अभिलेख कार्यालय, जयदेव वीर, जयराम नेवाळे, रमेश कोळंबकर, कोरल रेसिडेन्सीच्या दोन अशा सहा नळजोडण्या तोडण्यात आल्या. पाणीपुरवठा विभागाचे अभिकर्ता राजा केरीपाळे, सुनील चव्हाण, सुभाष कुमठेकर, श्री. तळवडेकर, सागर नरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यापुढेही थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी धडक कारवाई मोहिम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे श्रीमती हळदळणकर, श्री. केरीपाळे यांनी सांगितले.
ज्यांची वर्षानुवर्षे पाणीपट्टी व घरपट्टी थकीत आहे. त्यांच्यावर नळजोडणी तोडण्याची तसेच जप्तीची कारवाई पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी पाणीपट्टी थकबाकीदारांनी तसेच थकीत घरपट्टी धारकांनी थकीत रक्कम भरून पालिकेस सहकार्य करावे व कारवाई टाळावी असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा